जागतिक वन्यप्राणी दिन; गोष्ट पाणथळ प्रदेशांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 07:00 IST2022-03-03T07:00:00+5:302022-03-03T07:00:16+5:30

Nagpur News आजच्या जागतिक वन्यप्राणी दिनाच्या निमित्ताने आपण ह्या पाणथळ प्रदेशांबाबतीत अजून माहिती जाणून घेऊयात.

World Wildlife Day; The story of wetlands | जागतिक वन्यप्राणी दिन; गोष्ट पाणथळ प्रदेशांची

जागतिक वन्यप्राणी दिन; गोष्ट पाणथळ प्रदेशांची

नागपूरः आपल्यातल्या बऱ्याच लोकांची वाईल्डलाईफ/वन्यजीवांशी ओळख पक्षिनिरीक्षणातून झाली असेल. आधी खिडकी किंवा गॅलरीतून बुलबुल, हळद्या असे पक्षी बघून सुरुवात करून हळू-हळू जवळच्या बागेत मग शहराबाहेरची निसर्गरम्य ठिकाणं आणि मग जंगल, अशी साधारण पक्षिनिरीक्षकांची वाटचाल असते. हिवाळ्याच्या दिवसात तर नदी, तलाव अश्या पाण्याच्या ठिकाणी भरपूर गर्दी दिसते. हौशी लोकांपासून व्यायवसायिक आणि शास्त्रज्ञ, सगळेच आपल्या जवळच्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन पक्षी बघणं, त्याची ई-बर्ड वर नोंद करणं, फोटो काढणं, इतयादी करताना दिसतात. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले प्रवासी पक्षी एका जागी बघण्याची हि सुवर्ण संधी असते. तर आजच्या जागतिक वन्यप्राणी दिनाच्या निमित्ताने आपण ह्या पाणथळ प्रदेशांबाबतीत अजून माहिती जाणून घेऊयात.

पहिला प्रश्न हा की पाणथळ प्रदेश म्हणजे नक्की काय? १९७१ च्या रामसर ठरावानुसार सगळे तलाव, नदी, दलदली, त्यातील गवताळ प्रदेश, वाळवंटातले हिरवळ प्रदेश, प्रवाळ बेटे इत्यादी, म्हणजेच समुद्री किनारपट्टीशेजारच्या खारफुटी वनांपासून आतल्या भागातले जलाशय, हे सगळे पाणथळ प्रदेश म्हणून गणले जातात. रामसर ठरवामधे पाणथळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी रामसर करार आखण्यात आला जो ०१ फेब्रुवारी १९८२ पासून भारताने पण अधिकृत केला. ह्यानुसार देशभरात ४७ रामसर स्थळे आहेत, ज्यातल्या दोन महाराष्ट्रामधे आहेत: नाशिक जिल्ह्यातील नंदुर - माधमेश्वर अभयारण्य आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तलाव. ह्या जागांमधे एकत्र धरून हजारो पक्षी, झाडं, मासे, फुलपाखरं आणि इतर प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.

पण हल्ली अश्या जागा खूप वाईट अवस्थेत असतात. आजकाल पर्यटकांनी पसरवलेला कचरा दुर्दैवाने सगळीकडे आढळतो. आजूबाजूचे औद्योगिक कारखाने त्यांच्या बांधकाम व चालण्यानंतरच्या धूर, सांडपाणी इत्यादी हानिकारक प्रदूषक सोडल्यामुळे तिकडच्या हवा, पाणी आणि जमीन ह्यांना दूषित करतात. हे प्रदूषण वन्यजिवांपासून स्थानीय लोकांपर्यंत सगळ्यांसाठी हानिकारक असतंच, पण त्याचा पुढे जाऊन त्या जागेच्या सामाजिक व आर्थिक अवस्थेवर वाईट परिणाम होतो.

ही परिस्थिती भारतातील बऱ्याच पाणथळ प्रदेशांमधे बघण्यात येते. महाष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमधील सुमारे ३०० वर्षांपूर्वीपासून असे साधारण १५००० तलाव आहेत, ज्यांना माजी-मालगुजारी (मा-मा) तलाव म्हंटलं जातं. ह्यांचं नाव तिकडच्या मालगुजारी-पद्धतीवरून पडलं, जेव्हा हे तलाव मासेमारी आणि सिंचनासाठी वापरले जायचे. पण हे तलाव माश्यांचा आक्रमक प्रजाती आणि निवासस्थानाच्या नाशामुळे बऱ्याच अडचणीत होते. अश्या वेळी पक्षी-निरीक्षक मनीष राजनकर ह्यांनी स्थानीय धीवर समुदायातील शालू कोल्हे ह्यांच्या बरोबर गेल्या काही दशकात ह्या तलावांचं पुनरूज्जीवन केलं. त्या दोघांनी पारंपरिक पद्धती वापरून, लोकांची मदत घेऊन, तिथल्या बायकांना सक्षम करून ह्या तलावांना दोन्ही समस्यांपासून मुक्त होण्याच्या वाटेवर आणलं आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे ह्या जागेची प्राकृतिक आणि आर्थिक कायापालट झाली आहे.

 त्यामळे पुढच्या वेळी जेव्हा अश्या जागी जाऊन पक्षी-निरीक्षण करण्याची इच्छा होईल, तेव्हा ह्याबाबतीत पण विचार करूयात आणि जबाबदारीने त्या जागेच्या आणि तिथल्या लोकांच्या सगळ्या प्रकारच्या स्वास्थ्याचा विचार मनात ठेवून एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडूयात.

 गौरी घारपुरे

Web Title: World Wildlife Day; The story of wetlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.