जागतिक उच्च रक्तदाब दिन; चाळिशी गाठलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ‘हायपर टेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 07:00 IST2022-05-17T07:00:00+5:302022-05-17T07:00:07+5:30
Nagpur News आज चाळिशी गाठलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने पीडित आहे. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञांनी केले आहे.

जागतिक उच्च रक्तदाब दिन; चाळिशी गाठलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ‘हायपर टेन्शन’
सुमेध वाघमारे
नागपूर : उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन) हा आजार अपंगत्व आणि मृत्यूला सामोरे जाण्याचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. आज चाळिशी गाठलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने पीडित आहे. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञांनी केले आहे.
अयोग्य आहार, दूषित हवा, दूषित पाणी, स्वच्छतेची कमतरता, कुपोषित बाल व माता, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्जचे व्यसन, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा व ताण-तणाव आदी उच्च रक्तदाबाला जबाबदार घटक आहे. याला दूर ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवायला हव्यात. शिवाय, योग्य आहार, तणावावर नियंत्रण, नियमित व्यायाम व ड्रग्ज, तंबाखूचे सेवन बंद करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
- सर्वांत सामान्य लक्षणे
कोणतेही लक्षणे नसणे हेच उच्च रक्तदाबाचे सर्वांत सामान्य लक्षण आहे. उच्च रक्तदाब असलेले अनेकजण सामान्य पद्धतीने काम करीत राहतात. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर तीन महिन्यांतून एकदा रक्तदाब मोजणे आवश्यक आहे. रक्तदाब १४०/९० च्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. काहींमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धाप लागणे, अंधुक दिसणे ही लक्षणेसुद्धा दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये, नाकातून रक्त देखील येऊ शकते.
-घरी रक्तदाब तपासणे आवश्यक :डॉ. देशमुख
फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, उच्च रक्तदाब लवकर ओळखण्यासाठी घरी रक्तदाब तपासणे हे प्रभावी साधन आहे. विशेषत: मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी हे महत्त्वाचे ठरते. घरी नियमित रक्तदाबाच्या तपासणीमुळे डॉक्टरांना औषधांचा योग्य डोस लिहून देणे सोपे जाते.
-तंबाखू, धूम्रपान सोडल्यास लाभ : डॉ. संचेती
हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी रोज जास्तीत जास्त पाच ग्रॅम मिठाचे सेवन करावे. मिठाच्या सेवनावर नियंत्रण राहिल्यास हृदयाघात व ‘कोरोनरी हार्ट डिसिज’ला थांबविता येते. तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन पूर्णत: सोडल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-अचूक रक्तदाब मोजणे गरजेचे : डॉ. हरकुट
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणारा ‘हायपर टेन्शन’ हा आजार जिवावरही बेतू शकतो. पन्नाशीनंतर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हा आजार आहे. या आजाराचे तातडीने निदान व उपचार महत्त्वाचा ठरतो. विशेष म्हणजे, यात अचूक रक्तदाब मोजणे गरजेचे आहे. हा आजार इतर आजारांसारखा नाही. यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.