एसएनडीलच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी ठोकले कुलूप : वीजसंकटाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:52 IST2019-09-04T22:51:13+5:302019-09-04T22:52:47+5:30
वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले.

एसएनडीलच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी ठोकले कुलूप : वीजसंकटाची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. शहरातील कामकाज एक तासभर बंद ठेवले. दुसरीकडे कंपनीच्या ठेकेदारांनीही गुरुवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शहराला विजेच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एसएनडीएलने आपली ढासळती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता १२ ऑगस्टला महावितरणला पत्र लिहून कामकाज सुरू ठेवण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हापासून कंपनीचे व्हेंडर (ठेकेदार) आणि कर्मचारी अस्वस्थ आहेत. मागील दोन वर्षांपासून पीएलआय (इन्सेन्टिव्ह), वेतनवाढ आणि थकीत रक्कम देण्याची मागणीही कामगारांकडून होत आहे.
दरम्यान, बँकांनी अकाऊंट सीज केले असून, महावितरणसोबत तोडग्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून पैसे मिळाल्यावरच कर्मचाºयांना रक्कम दिली जाईल, असे एसएनडीएल कंपनी चालविणाऱ्या एस्सेल युटीलिटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांनी सांगितले. यामुळे कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी तासभर काम बंद ठेवले. त्यानंतर सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. कंपनीचे बिझिनेस हेड सोनल खुराणा यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. मात्र कर्मचारी काहीही एकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांनी सोबत आणलेले कुलूप कार्यालयाला ठोकले. या घडामोडीपूर्वी कंपनीच्या व्हेंडरांनीही कार्यालयात येऊन थकीत रकमेच्या मागणीसाठी खुराणा यांना घेराव घातला होता. निघताना त्यांनी गुरुवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला.
आपल्या व्यवस्थापनासह ऊर्जामंत्री आणि महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे कर्मचाऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी मागणी केली होती. मात्र कुणीच मनावर घेतले नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कॉल सेंटर बंद, काम ठप्प
वीज पुरवठ्यासंदर्भातील तक्रार नोंदविण्यासाठी एसएनडीएलने सुरू केलेले कॉल सेंटर आज ठप्प होते. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय आला. ग्राहकांनी तक्रार नोंदविण्यासाठी कॉल केले, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीचे अनेक कार्यालयेही आज तासभर बंद होते. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील वीज पुरवण्याची स्थिती गंभीर होऊ शकते.
आंदोलन होणार तीव्र
पंतप्रधान मोदी ७ सप्टेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे शहरातील वीज पुरवठा प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीला एसएनडीएल आणि एस्सेल समूहाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
घटनाक्रमावर महावितरणचे बारीक लक्ष
सुरू असलेल्या घडामोडीवर महावितरणचे बारीक लक्ष आहे. ७ सप्टेंबरनंतर महावितरण केव्हाही हे कामकाज हातात घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कार्यकारी अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी घटनाक्रमाची माहिती संचालक (परिचालन) यांना दिली. शहरवासीयांना महावितरण वीज संकटात पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.