सफाई कामगारांना शिवीगाळ करून जबर मारहाण; झोनमधील कर्मचाऱ्यांचे काम बंद
By गणेश हुड | Updated: October 10, 2022 16:01 IST2022-10-10T16:00:07+5:302022-10-10T16:01:01+5:30
कर्मचारी संघटनेची दोषीवर कठोर कारवाईची मागणी

सफाई कामगारांना शिवीगाळ करून जबर मारहाण; झोनमधील कर्मचाऱ्यांचे काम बंद
नागपूर : असामाजिक तत्वांनी कोणतेही कारण नसताना शनिवारी सकाळी ८.३० वाजता श्रीकृष्ण नगर येथे नेहरू नगर झोन येथील चेंबर सफाई करणाऱ्या वाहनावरील कर्मचारी हुकूम गोराडे व अन्य दोघांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच गाडीच्या काचा फोडल्या. यापूर्वी गणपती विसर्जनाची व्यवस्था बघणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास मारहाण केली होती. यातील दोषींवर पोलिसांनी कारवाई करून अटक करावी, यासाठी राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोशिएशन (इंटक) च्या नेतृत्वात सोमवारी नेहरूनगर झोन कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून निदर्शने केली.
सफाई कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात पोलिसात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे संतप्त कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. सफाई कर्मचा-यांसह झोनमधील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. झोनमधील सफाईची कामे बंद होती. यासंदर्भात नंदनवन पोलीस स्टेशनलाही निवेदन दिले. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.
कारण नसताना मनपा कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहे. मनपा प्रशासनानेही अशा घटना घडणार नाही. यासाठी पोलीस प्रशासनाला सूचित करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते.