शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज सुरू होते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:12 IST2026-03-04T17:10:19+5:302026-03-04T17:12:28+5:30

Nagpur : 'एसबीएल'मध्ये कमी शिकलेल्या कामगारांसाठी चक्क इंग्रजीत सूचना

Work begins daily on the death mound without proper training | शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज सुरू होते काम

Work begins daily on the death mound without proper training

योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' कंपनीत झालेल्या स्फोटात कित्येक कुटुंबांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. अक्षरशः मृत्यूच्या ढिगाऱ्यावर दररोज काम करणाऱ्या कामगारांना कंपनीने कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावरील अवशेष आणि इतर कामगारांनी सांगितलेल्या त्यांच्या आपबितीतून हा प्रकार समोर आला आहे.

कंपनीच्या 'नोनल क्रिम्पिंग' या युनिटमध्ये डेटोनेटर्सच्या शेल्सच्या पॅकेजिंगचे काम करण्यात येत होते. हे काम अत्यंत जिकिरीचे असते. दोन कामगारांचे साहित्य एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी संबंधित युनिटमध्ये वेगवेगळे लहान केबिन्स तयार करण्यात आले होते. तेथे मशीन्सच्या आधारे पॅकेजिंग व क्रिम्पिंगचे काम सुरू होते. जोखमीचे काम असल्याने यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. मात्र, कंपनीकडून गावांमधील महिलांना हे काम देण्यात आले होते.

निष्काळजीपणामुळे स्फोट

सध्या ही घटना कशी झाली याची चौकशी सुरू झाली आहे. परंतु, पेसो, 'डिश'चे (डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) अधिकारी आणि कामगार आयुक्त विभागाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात म्हणावे तसे काम केले नाही. विभागीय आयुक्त आणि पोलिस अधीक्षक या विभागांची जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाईची शिफारस करतील.
घटनेचा प्राथमिक रिपोर्ट आला असून निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम अहवाल येईल व जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सूचनांच्या नावाखाली अशीदेखील थट्टा...

एसबीएलमधील बहुतांश कामगारांना इंग्रजी येत नाही. मात्र, अगदी स्फोट झालेल्या युनिटसह इतर ठिकाणी जागोजागी कंपनीकडून 'स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर'ची नियमावली चक्क इंग्रजीत लावण्यात आली आहे.

'लोकमत'ला त्यातील एक नियमावलीचा कागद कामगारांनी दिला. त्याचा फॉन्टदेखील इतका लहान आहे की जवळ गेल्याशिवाय त्या सूचना स्पष्टपणे दिसतदेखील नाही. त्यातील किती सूचना कामगारांना प्रत्यक्ष समजल्या असतील हा एक मोठा प्रश्नच आहे.

'शेल' की 'सेल' ?

कंपनीकडून कामगारांना प्रशिक्षण दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र 'लोकमत'ने कामगारांना विचारणा केली असता बोटांवर मोजता येतील इतके कामगार सोडले तर सर्व जण 'शेल'ला 'सेल' असेच म्हणत होते. यातूनच किती 'शास्त्रशुद्ध' प्रशिक्षण देण्यात आले होते हे स्पष्ट झाले.

अपघात 'टार्गेट'मुळे ?

संबंधित युनिटसह इतर ठिकाणी प्रत्येक कामगारांना दररोजच्या कामाचे विशिष्ट टार्गेट देण्यात आले होते. प्रत्येक कामगाराला २५ शेल्सचे बॉक्स भरणे अनिवार्य होते. एका बॉक्समध्ये १०० शेल्स येतात.'

Web Title : विस्फोटक कारखाने में बिना प्रशिक्षण के कामगारों की जान जोखिम में

Web Summary : एसबीएल एनर्जी में उचित प्रशिक्षण की कमी से घातक विस्फोट हुआ। कामगारों ने बिना पर्याप्त कौशल के खतरनाक विस्फोटकों का संचालन किया। लापरवाही और अवास्तविक लक्ष्यों ने दुर्घटना में योगदान दिया, जिससे सुरक्षा निरीक्षणों की जाँच और त्रासदी के लिए जवाबदेही तय की जा रही है।

Web Title : Untrained Workers Risk Lives Daily at Explosives Factory: Report

Web Summary : SBL Energy lacked proper training, leading to a fatal explosion. Workers handled dangerous detonators without adequate skills. Negligence and unrealistic targets contributed to the accident, prompting investigations into safety oversights and accountability for the tragedy.