विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू, अपघात की आत्महत्या हे गूढच?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:17 IST2023-01-24T17:16:13+5:302023-01-24T17:17:03+5:30
जरीपटक्यातील घटना

विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू, अपघात की आत्महत्या हे गूढच?
नागपूर : औषधी द्रव्य पिल्याने प्रकृती गंभीर झालेल्या एका महिलेचा अखेर मृत्यू झाला. संबंधित महिलेने चुकीने द्रव्य प्राशन केले होते की तिने आत्महत्या केली या दिशेनेे तपास सुरू आहे. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पूनम विजय गणवीर (वय ३०, बेझनबाग) असे मृत महिलेचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला व प्रकृती खराब झाली असल्याचे सांगितले. संबंधित मित्र घरी आले असता पूनम यांच्या तोंडातून फेस येत होता व त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर मेयो रुग्णालयात वॉर्ड क्रमांक ३७ मध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही व त्यांचा मृत्यू झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम यांनी टाईल्स स्वच्छ करणारे द्रव्य घेतले होते. त्या एकट्याच राहत होत्या व नेमक्या कुठल्या कारणातून हे द्रव्य घेतले ही बाब समोर आलेली नाही. त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, त्या काही दिवसांपासून तणावात होत्या. जरीपटका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.