पिन जनरेटचा केला बहाणा अन् ४० हजारांनी लावला चुना; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 17:40 IST2022-10-31T17:19:03+5:302022-10-31T17:40:42+5:30
एटीएम कार्डची अदलाबदल; आरोपी अटकेत

पिन जनरेटचा केला बहाणा अन् ४० हजारांनी लावला चुना; नागपुरातील घटना
नागपूर : एटीएमचे नवे कार्ड आल्यानंतर नवा पीन ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून तिच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून तिची फसवणूक केली. ही घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मयूर अनिल कायरकर (३१, प्लॉट नं. २३, विश्वकर्मानगर, गल्ली नं. ४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी निहार युवराज रामटेके (२४, यादवनगर, सुदामनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. निहारची आई गंगासागर रामटेके व भाऊ अमित रामटेके यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टेकानाका नारी रोड, कपिलनगर शाखेत जॉईंट अकाऊंट आहे.
काही दिवसांपूर्वी गंगासागर रामटेके यांच्या नावाने नवीन एटीएम कार्ड घरी आले. त्यामुळे निहार एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी बँकेत गेला. तेथे नवा पिन ॲक्टिव्ह करीत असताना त्यांना पिन जनरेट करणे जमले नाही. त्यामुळे निहारने तेथे हजर असलेला आरोपी मयूर अनिल कायरकर यास पिन जनरेट करून देण्याची विनंती केली. आरोपी मयूरने निहारची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदल करून निघून गेला. त्यानंतर आरोपीने निहारच्या आईच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. निहारने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी मयूर कायरकरविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४१७, ४२० नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.