नागपूरच्या सदर छावणी येथील गोदामाला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 20:37 IST2021-01-07T20:33:31+5:302021-01-07T20:37:02+5:30
Fire at warehouse, Woman death सदर छावणी येथील अनिल काटरपवार यांच्या मालकीच्या दोन मजली इमारतीमधील गोदामात ठेवलेले केमिकल पदार्थ व फटाक्यांना गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत येथे काम करणाऱ्या लताबाई काटरपवार या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला.

नागपूरच्या सदर छावणी येथील गोदामाला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर छावणी येथील अनिल काटरपवार यांच्या मालकीच्या दोन मजली इमारतीमधील गोदामात ठेवलेले केमिकल पदार्थ व फटाक्यांना गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत येथे काम करणाऱ्या लताबाई काटरपवार या वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या घरातील ग्राऊंडवर केमिकल पदार्थ होते तर वरच्या माळ्यावर उरलेले फटाके ठेवले होते. आग लागली आणि एकच धावपळ सुरू झाली. स्फोट होत होते. त्यामुळे घरातील लोक बाहेर पडले. परंतु काम करणारी महिला आत अडकून पडली. ती आत असल्याची कुणालाही माहिती नव्हती.
यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका मुलीचा थोडक्यात जीव वाचला. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी आग आटोक्यात आणली. मलबा हटविण्याचे काम सुरू असताना यात महिलेचा जळालेला मृतदेह आढळला. ही महिला गोदामात साफसफाईचे काम करत होती. ती घरमालकाची नातेवाईक असल्याची माहिती मिळाली. याची माहिती सदर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.