ऐन अंत्यसंस्काराच्या वेळी घडला अनर्थ : स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, आठ महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 22:31 IST2019-07-27T22:23:10+5:302019-07-27T22:31:11+5:30
अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या टाकळी (ता. कुही) येथे शुक्रवारी घडली.

ऐन अंत्यसंस्काराच्या वेळी घडला अनर्थ : स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, आठ महिला जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (मांढळ) : अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या टाकळी (ता. कुही) येथे शुक्रवारी घडली.
विमल रमेश भोयर (४५) असे मृत महिलेचे नाव असून, जखमींमध्ये शकुंतला महादेव डोळस (४२), गोदाबाई जयपाल खराबे (५०), राधाबाई कृष्णा ईश्वरकर (४२), रत्नमाला मनोहर रामटेके (४०), आचल रमेश भोयर (१६), मेघा छबिलाल नानवटकर (१७), मोनिका युवराज भोयर (२१) व निकिता दिलीप ठवकर (१७) सर्व , रा. टाकळी, ता. कुही यांचा समावेश आहे.
आशिष अशोक भोयर (२६, रा. टाकळी) हा काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान गुरुवारी (दि. २५) रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करणार होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिक अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी त्याच्या घरी गोळा झाले होते.
घराच्या अंगणात उभे राहण्यासाठी जागा नसल्याने काही महिला घराच्या स्लॅबवर चढल्या. त्या घराचे नव्याचे बांधकाम करण्यात आले असून, बांधकाम पक्के व्हायचे होते. त्यातच महिलांच्या वजनामुळे स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यात सहा महिला व तीन तरुणींना दुखापत झाली. शिवाय, विमल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लगेच साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सुटी देण्यात आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.