नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत जळून मृत्यू झाला, तर तिची अल्पवयीन मुलगी जखमी झाली. आकांक्षा सोसायटीत ही घटना घडली. अनुप्रिया संजय जोशी असे ५२ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. संजय जोशी हे हैदराबादच्या औषध कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते मूळचे कारंजा-लाड येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी आहेत.
जोशी हे कारंजा-लाड येथे गेले होते. अनुप्रियाची मानसिक स्थिती ठीक नाही. यामुळे जोशी यांनी पत्नी व मुलीला घरात सोडून बाहेरून कुलूप लावले होते. सोमवारी सकाळी घराला आग लागली व त्यात अनुप्रिया जळल्या, तर मुलीने बाल्कनीत येऊन आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळाली. अनुप्रिया यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जोशी यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. घरातील सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याचा संशय आहे. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.