१०० झोपड्या जळाल्या, तरी कारवाई नाही; संतप्त महिलेचा नागपुरात विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 20:30 IST2025-12-09T20:28:28+5:302025-12-09T20:30:25+5:30
पुण्यातील महिलेने अत्यंत टोकाचे पाऊल उलल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली होती.

१०० झोपड्या जळाल्या, तरी कारवाई नाही; संतप्त महिलेचा नागपुरात विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
Winter Session Nagpur: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान यशवंत स्टेडियम परिसरात एक गंभीर आणि संवेदनशील घटना घडली. पुण्यातील चंदननगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील त्रुटी आणि कारवाई न झाल्याच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या सीताबाई धांडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिस प्रशासनावर तातडीची जबाबदारी येऊन पडली.
चंदननगरमधील विकास प्रकल्पाच्या कामात बोगस संमतीपत्रे वापरून जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या वादातून २३ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या आगीत शंभर झोपड्या जळून खाक झाल्या होत्या आणि दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. इतकी मोठी दुर्घटना घडूनही संबंधित बिल्डरवर अद्याप कोणतीही गुन्हेगारी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून सातत्याने केला जात आहे.
या प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जात असल्याची नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या बाहेर आंदोलन पुकारले. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या सीताबाई धांडे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना रोखले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रकल्प, कारवाई, सुरक्षा आणि आंदोलकांच्या मागण्यांकडे शासन स्तरावरून अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.