पाण्याविना मेडिकलमधील रुग्णांचे हाल होणार; ‘ओसीडब्ल्यू’ने दिला तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याचा सूचना
By सुमेध वाघमार | Updated: February 9, 2024 20:00 IST2024-02-09T20:00:10+5:302024-02-09T20:00:31+5:30
मेडिकलला दरदिवशी १८ ते २२ लाख लिटर पाण्याची गरज असताना ‘ओसीडब्ल्यू’कडून रोज चार ते पाच लिटर पाणी कमीच मिळ असल्याची तक्रार आहे.

पाण्याविना मेडिकलमधील रुग्णांचे हाल होणार; ‘ओसीडब्ल्यू’ने दिला तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याचा सूचना
नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) मागणीच्या तुलनेत कमी पाणी मिळत असताना ‘ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’कडून (ओसीडब्ल्यू) १२ ते १४ फेब्रवारी, सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा सूचना आहेत. त्यामुळे मेडिकल प्रशासन अडचणीत आले आहे. पाणी साठवून तरी किती ठेवणार हा प्रश्न आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे हाल होण्याची शक्यता आहे.
मेडिकलला दरदिवशी १८ ते २२ लाख लिटर पाण्याची गरज असताना ‘ओसीडब्ल्यू’कडून रोज चार ते पाच लिटर पाणी कमीच मिळ असल्याची तक्रार आहे. रोज पाणी टंचाईला मेडिकल तोंड देत असताना पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली पुढील आठवड्यातील सोमवारी १० वाजेपासून ते बुधवारपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आज दूरध्वनीवरून मनपा पाणीपुरवठा अधिकारी अजय घरजाडे यांनी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांना दिली. त्यांनी याबाबत लेखी पत्राची मागणी केली. पत्र आल्यावरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. गावंडे यांनी सांगितले.
दोन दिवस जास्तीचा पाणीपुरवठा
‘लोकमत’शी बोलताना घरजाडे म्हणाले, दुरुस्तीसाठी मेडिकलचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. तसे नियोजन केले जात आहे. या बाबतच्या तोंडी सूचना मेडिकलला देण्यात आल्या आहेत. लवकरच लेखी सुद्धा कळविण्यात येईल. १२ फेब्रुवारी सकाळी १०वाजतापासून तर पढील ४८ तास दुरुस्तीचे काम चालणार आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहिल. त्यापूर्वी दोन दिवस जास्तीचा पाणीपुरवठा केला जाईल. मेडिकलने हे पाणी स्टोअर करावे, यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा बंदच्या दिवशी गरज पडल्यास टॅँकरने पाणीपुरवठा केला जाईल. रुग्णालय प्रशासनाने या दिवसांत काटकसर करून पाण्याचा वापर करावा, असेही ते म्हणाले.