खातेवाटप दोन दिवसांत, तीनही मित्रपक्षांचे एकमत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 06:03 IST2024-12-16T06:03:25+5:302024-12-16T06:03:56+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

winter session maharashtra 2024 department allocation in two days said cm devendra fadnavis | खातेवाटप दोन दिवसांत, तीनही मित्रपक्षांचे एकमत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

खातेवाटप दोन दिवसांत, तीनही मित्रपक्षांचे एकमत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील नवनिर्वाचित सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप येत्या दोन दिवसांत होणार आहे. खात्यांबाबत तीनही मित्रपक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे. दोन दिवसांत उर्वरित बाबींवर निर्णय घेऊन खात्यांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामाचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चांगले काम करणारे मंत्रीच पुढे जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. काही लोकांना संघटनेत जबाबदारी देण्यात येणार असल्याने मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. तर काही लोकांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याने त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झालेला नाही. शिंदेसेना आणि अजित पवार गटाने प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपही असाच निर्णय घेणार आहे का? यासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, भाजप आपल्या स्तरावर मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट करणार आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ देण्यामागे मंत्र्यांना अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल आणि अधिकाधिक लोकांना मंत्रिमंडळात येण्याची संधी मिळेल, हा उद्देश असल्याचे शिंदे आणि पवार यांनी सांगितले. पण याचा अर्थ असा नाही की जे चांगले काम करत नाहीत त्यांनाही बढती मिळेल. काम दाखवा नाही तर घरी जा, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींसाठी तीनशेपट जास्त जागा

लाडक्या बहिणींच्या बळावर प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुती सरकारमध्ये चार महिलांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एवढ्या कमी संख्येने महिलांना संधी का देण्यात आली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील सरकारच्या तुलनेत यंदा लाडक्या भगिनींना तीनशेपटीने जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. भविष्यात लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावांनाच जागा मागण्याची वेळ येणार असल्याचेही ते म्हणाले. 

विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाची माहिती देणारे आज विरोधकांनी सादर केलेले पत्र हे खरे तर गेल्या अधिवेशनाचे पत्र आहे. या पत्रात केवळ ईव्हीएमवरील परिच्छेद जोडण्यात आला आहे. याच कारणावरून पत्रकार परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांनी हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हटले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

बीड प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ 

बीड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. परभणी प्रकरणातही एका मनोरुग्णाने संविधानाच्या शिलालेखाचा अवमान केल्याचे सांगितले. त्याला अटक करण्यात आली आहे. असे असतानाही तेथे असंवैधानिक पद्धतीने अशांतता निर्माण झाली, हे योग्य नाही. छायाचित्र आणि फुटेजमध्ये कैद झालेल्या लोकांवर पोलिस योग्य ती कारवाई करतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Web Title: winter session maharashtra 2024 department allocation in two days said cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.