'त्या' शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळणार? दिवाळीतही महसूल यंत्रणा कार्यरत
By योगेश पांडे | Updated: October 17, 2025 18:14 IST2025-10-17T18:02:12+5:302025-10-17T18:14:00+5:30
Nagpur : सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील.

Will 'those' farmers get relief funds before Diwali? Will the revenue system work even during Diwali?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळावा, यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात असल्याने टीका करतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, राज्यातील सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण विसरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
ओबीसी–मराठा आरक्षणाबाबत भुजबळांना दिली स्पष्टता
२ सप्टेंबरचा आदेश हा केवळ हैदराबाद गॅझेट आणि चार जिल्ह्यांपुरता आहे. राज्य सरकारकडून खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.ओबीसींचे हक्क अबाधित राहतील आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही, असे त्यांना सांगण्यात आल्याची बावनकुळे यांनी माहिती दिली.
नागपूरसाठी अधिक एसटी बसेस
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागपूरसाठी अधिक एसटी बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील अनियमिततेवरही चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.