‘त्या’ मृत पोलिसांचे कुटुंबीय विमा लाभाला मुकणार ?

By Admin | Updated: July 16, 2015 03:10 IST2015-07-16T03:10:46+5:302015-07-16T03:10:46+5:30

वेतनातून एलआयसी पॉलिसी कपात न करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा जबरदस्त फटका नुकतेच निधन झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे.

Will those 'dead' police family lose their insurance? | ‘त्या’ मृत पोलिसांचे कुटुंबीय विमा लाभाला मुकणार ?

‘त्या’ मृत पोलिसांचे कुटुंबीय विमा लाभाला मुकणार ?

पोलीस आयुक्तांच्या निर्णयाने चुकला एलआयसीचा हप्ता
लोकमत विशेष
आनंद डेकाटे नागपूर
वेतनातून एलआयसी पॉलिसी कपात न करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा जबरदस्त फटका नुकतेच निधन झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्णयामुळे त्या पोलिसांचे गेल्या महिन्याचा एलआयसीचा हप्ता चुकला. त्यामुळे त्या पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एलआयसीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यक्ती भविष्यात आपल्याला काही झाले तर आपल्या कुटुंबीयांना कुणापुढे हात पसरावे लागू नये म्हणून एलआयसी काढून ठेवते. आपल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकजण एखाद तरी पॉलिसी काढतोच. पोलीसही त्यातून सुटले नाहीत. पोलिसांचा कामाचा व्याप पाहता त्यांच्या एलआयसीच्या हप्त्याची रक्कम त्यांच्या वेतनातूनच कपात केली जात होती. परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त यादव यांनी एक निर्णय घेत ‘एलआयसी किंवा सोसायटीची देय असलेली रक्कम ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात न करता ती त्यांनी स्वत: भरावी’ असे आदेश जारी केले होते. या निर्णयाला अनेकांनी विरोधही केला होता. या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत.
सूरजप्रसाद चौबे आणि संजय बघेल असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सूरजप्रसाद चौबे यांचा गेल्या २ जुलै रोजी मृत्यू झाला. ते मुख्यालयात कार्यरत होते. त्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या तीन आणि ३ लाख रुपयाची एक अशा एकूण चार पॉलिसी काढल्या होत्या. ९७२२५६४७७,९७२७९०९६, ९७३६८३५३६ आणि ९७३६३६५९७ हा त्यांचा पॉलिसी क्रमांक आहे. त्याचप्रकारे संजय बघेल याचाही गेल्या रविवारी मृत्यू झाला. ते हेड कॉन्स्टेबल होते. यासोबतच ते फुटबॉल रेफरी सुद्धा होते. त्यांनी सुद्धा पॉलिसी काढली होती. ९७२९१६४०४ हा त्यांचा क्रमांक आहे. परंतु जून महिन्याचा हप्ता त्यांना भरता आला नाही. हे सर्व पोलीस आयुक्तांच्या नवीन निर्णयामुळे झाले आहे. त्यामुळे या मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना या एलआयसीचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Will those 'dead' police family lose their insurance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.