नैऋत्य मान्सून १३ मे पर्यंत अंदमानात पाेहचणार?
By निशांत वानखेडे | Updated: May 8, 2025 18:39 IST2025-05-08T18:39:03+5:302025-05-08T18:39:56+5:30
Nagpur : पण महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास परिस्थितीवर अवलंबून

Will the southwest monsoon reach the Andamans by May 13?
निशांत वानखेडे
नागपूर : नैऋत्य मान्सून, म्हणजेच भारतीय मान्सून म्हणजेच यंदाचा पावसाळा भारतीय महासागरांच्या सीमेवर लवकर दाखल हाेईल, असा अंदाज आहे. प्रशांत महासागरातून सुरू झालेला मान्सून मलेशिया, सिंगापुर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून १३ मे पर्यंत म्हणजे येत्या पाच दिवसात भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल हाेईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, सध्या ला-निनाे व अल-निनाे न्यूट्रल म्हणजे तटस्थ स्थितीत आहेत. शिवाय भारतीय महासागरीय द्विध्रुविता (आयओडी) हा सुद्धा तटस्थ स्थितीत आहे. या दाेन्ही घटकांचा मान्सूनच्या प्रवासाशी संबंध जाेडता येणार नाही. मार्गातील नैसर्गिक परिस्थितीवर त्याचा वेग व वाटचाल अवलंबून आहे. मात्र ताे अंदमानात वेळेपूर्वी दाखल हाेईल, ही शक्यता सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले. वाढलेल्या तापमानामुळे बहुतेक सागरी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनला गती मिळाली, असे काहींचे मत आहे.
दरम्यान ताे अंदमानात आला म्हणजे ताे लवकरच केरळात आणि तिथून निर्धारीत १० जून पर्यंत महाराष्ट्रात पाेहचेल, असा अंदाज बांधता येणार नाही, हेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. बरेचदा अंदमानात पाेहचला किंवा तिथून ताे केरळपर्यंत पाेहचला, तरी तेथील नैसर्गिक परिस्थितीमुळे ताे बरेच दिवस तेथे रेंगाळत असताे. गेल्या वर्षी अशीच स्थिती हाेती. निर्धारीत १ जून किंवा त्यापूर्वी अंदमानातून केरळपर्यंत पाेहचल्यानंतरही ताे कर्नाटक मार्गे महाराष्ट्रात वेळेत पाेहचेल की उशीरा, याबाबत ३१ मे पर्यंत स्पष्ट हाेईल, असे खुळे यांनी सांगितले.
विदर्भाला करावी लागेल प्रतीक्षा
नागपूरसह विदर्भात केरळकडून येणाऱ्या नैऋत्य माेसमी वाऱ्यामुळे नाही, तर बंगालच्या खाडीकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस येताे. विदर्भात मान्सून पाेहचण्यासाठी १६ जून ही तारीख निर्धारीत मानली जाते. मात्र गेल्या वर्षी २२ जूनला मान्सूनचा पाऊस पडला हाेता, पण त्यानंतरही जैलपर्यंत हुलकावणी दिली हाेती. त्यामुळे यावेळी काय हाेईल, हे त्यावेळच्या नैसर्गिक स्थितीवर अवलंबून असेल.