सुनील चरपे, लाेकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्र सरकारने कच्च्या साेयाबीन, सूर्यफूल व पाम तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. या तिन्ही तेलांची आयात वाढणार असून, ऑक्टाेबरपासून पुढे साेयाबीनचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी)पेक्षा कमी राहण्याचा धोका आहे. परिणामी, सरकारच्या या निर्णयाचा देशातील साेयाबीन उत्पादकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे.
सरकारने २०२४ मध्ये कच्च्या खाद्यतेलावर २० टक्के, तर रिफाइंड खाद्यतेलावर २९.७५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावला हाेता. उपकर विचारात घेता कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीसाठी २७.५० टक्के, तर रिफाइंड तेलासाठी ३५.७५ टक्के शुल्क द्यावा लागायचा. देशात साेयाबीन पेरणीची धावपळ सुरू असताना केंद्र सरकारने ३० मे राेजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कमध्ये ५० टक्क्यांनी कपात केली आहे. रिफाइंड साेयाबीन, सूर्यफूल व पामतेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीला उपकरांसह १६.५० टक्के कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे. हा निर्णय खाद्य तेल उत्पादकांच्या फायद्याचा ठरणार आहे.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येणार परदेशातून तेल
- यात सर्वाधिक कच्च्या साेयाबीन व पामतेलाची आयात केली जाणार आहे. देशातील आयातदारांनी साैदे सुरू केले असून, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ते तेल देशात येईल.
- त्यानंतर शेतकऱ्यांचे साेयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर ४,००० ते ४,३०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता शेतमाल बाजार तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.
लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार
- मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम होणार असून, लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली.
- परिणामी यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
- कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात एकूण १४४.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये धान्य, कडधान्य, तेलबिया आणि कापूस यांचा समावेश आहे.
पेरणीपूर्वीच ब्राझीलच्या बाजारात साैदे झाले सुरू
- ब्राझीलमध्ये साेयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन २०२६ साठी त्यांच्या साेयाबीनचे ११ डाॅलर प्रतिबुशेल (एक बुशेल- २७.२२ किलाे) दराने आताच साैदे केले आहेत.
- त्यामुळे जागतिक बाजारात साेयाबीनचे दर ३,४५८ ते ३,५५० रुपये प्रतिक्विंटल असेल.
- यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने साेयाबीनची एमएसपी ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.