शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; संतुलित विकास करणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:21 IST2024-12-22T07:20:46+5:302024-12-22T07:21:03+5:30

विदर्भ, मराठवाडा, कोकणसह राज्याचा संतुलित विकास आपले सरकार करेल.

will provide loan waiver to farmers ensure balanced development says CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; संतुलित विकास करणार : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; संतुलित विकास करणार : मुख्यमंत्री

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत दिली. विदर्भ, मराठवाडा, कोकणसह राज्याचा संतुलित विकास आपले सरकार करेल. आधीच्या महायुती सरकारमधील लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी पुढेही सुरू राहील. विदर्भात गेल्या दोन वर्षांत १.२३ लाख कोटी रुपयांची तर मराठवाड्यात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, असे ते म्हणाले.

मराठवाडा वॉटर ग्रीड साकार होणार 

मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना निश्चितपणे साकारली जाईल. आपल्या आधीच्या सरकारने ही योजना बनविली होती; पण महाविकास आघाडी सरकारने त्याचा प्रस्तावच केंद्राकडे पाठविला नाही. आता आमच्या सरकारने त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. या योजनेमुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची मिटेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही मिळणार २० हजार रुपये बोनस 

महायुती सरकारने गेल्यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना २० हजार रुपये बोनस दिला होता, यावर्षीही २० हजार रुपये दिले जातील अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर धान खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. कापूस आणि सोयाबीनची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. संत्रा उत्पादकांना १६५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, कळमेश्वर आणि बुलडाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली जाईल, असे ते म्हणाले.

कोणकोणत्या घोषणा केल्या मुख्यमंत्र्यांनी? 

गोसी खुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार, जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तेथे उभारणार. 

विदर्भात वैनगंगा-पैनगंगा- नळगंगा नदीजोड योजनेची निविदा जारी, १० लाख हेक्टरचे सिंचन होणार. या योजनेत ५५० किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार.

विदर्भातील ११० सिंचन प्रकल्पांना मंजुरी, ६१ कामे पूर्ण 

मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्यासाठी पुरेसा निधी देणार. 

अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक होणार.

गडचिरोलीत साकारणार विमानतळ 

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद येत्या तीन वर्षांत संपविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. दक्षिण गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा सर्वांत मोठा नेता गिरधर याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. १५०० स्थानिक युवक पोलिस दलात नोकरीला लागले आहेत. गडचिरोलीचा विकास देशाची सर्वांत मोठी स्टील सिटी म्हणून केला जाईल. त्यात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. गडचिरोलीत विमानतळाची उभारणीही केली जाईल.

ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग होणारच 

पुण्याच्या शिरुरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा ग्रीनफिल्ड दुतगती मार्ग कोणत्याही परिस्थितीत उभारला जाईल, त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. मनमाड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरी मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सूप वाजले, ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

हिवाळी अधिवेशन शनिवारी संपले. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात याची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून मुंबईत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर करण्यात आली. विधानसभेत ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले. सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८७.८० टक्के होती, तर सरासरी उपस्थिती ७२,९० टक्के होती. विधान परिषदेत ३६ तास कामकाज झाले. अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८७.७६ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७९.३० टक्के इतकी होती.
 

Web Title: will provide loan waiver to farmers ensure balanced development says CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.