वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; सहा आराेपींना अटक
By निशांत वानखेडे | Updated: July 27, 2024 18:13 IST2024-07-27T18:11:51+5:302024-07-27T18:13:59+5:30
वाघाच्या कातडीसह सहा आराेपी ताब्यात : नागपूर व पुणे सीमा शुल्क विभागाची जळगावमध्ये कारवाई

Wildlife smuggling racket busted; Six arrested
नागपूर : सीमा शुल्क विभाग, नागपूरच्या अधिकाऱ्यांनी पुणे सीमा शुल्क विभागाच्या सहकार्याने वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे जळगाव येथे संयुक्त कारवाई केली. यात सहा आराेपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे.
नागपूर सीमा शुल्क विभागाच्या विशेष तपास आणि गुप्तचार शाखा (एसआयआयबी) यांना जळगाव येथे वन्यप्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सीमा शुल्क आयुक्त संजय कुमार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. यात पुणे कस्टम आयुक्त कार्यालयाची मदत घेण्यात आली. त्यांच्याकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सहा आराेपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत कस्टमचे सहायक आयुक्त अंजुम तडवी, अधिक्षक प्रभाकर शर्मा, अधीक्षक शाम कोठावडे, अधीक्षक प्रसेनजीत सरकार तसेच कस्टमचे निरीक्षक अनिकेत धोंडगे आणि पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांचा सहभाग हाेता. वन्यजीव तस्करीचे हे प्रकरण यानंतर प्रकरण डीसीएफ, वन विभाग जळगाव यांच्या अधिकाऱ्यांना साेपविण्यात आले.