पत्नीचे परपुरुषाच्या घरी वारंवार राहणे पतीसाठी मानसिक आघात; हायकोर्टाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:00 AM2021-03-01T07:00:00+5:302021-03-01T07:00:37+5:30

Nagpur news अनेकदा समजावल्यानंतरही पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार जाऊन तेथे मुक्काम करीत असेल, तर तिची ही कृती पतीसाठी मोठा मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले .

The wife's frequent stay at the other man's house is a trauma for the husband | पत्नीचे परपुरुषाच्या घरी वारंवार राहणे पतीसाठी मानसिक आघात; हायकोर्टाचे निरीक्षण

पत्नीचे परपुरुषाच्या घरी वारंवार राहणे पतीसाठी मानसिक आघात; हायकोर्टाचे निरीक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देघटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेकदा समजावल्यानंतरही पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार जाऊन तेथे मुक्काम करीत असेल, तर तिची ही कृती पतीसाठी मोठा मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले आणि संबंधित पतीला कुटुंब न्यायालयातून मिळालेला घटस्फोट कायम ठेवला.

नागपूर येथील सुरेखा व नामदेव (बदललेली नावे) यांचे २४ मे १९८४ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर त्यांनी २००६ पर्यंत आनंदात संसार केला. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या संसाराचे गणित सुरेखाची आई नागपुरात आल्यानंतर बिघडले. तिच्या आईने एका पोलीस अधिकाऱ्याकडे घरकामाची नोकरी मिळवली होती व ती त्याच्याच घरी राहत होती. सुरेखा आईला भेटण्यासाठी जात होती. सुरुवातीला त्यावर नामदेवचा काहीच आक्षेप नव्हता; परंतु काही दिवसांनी सुरेखाचे त्या पोलीस अधिकाऱ्याकडे जाणे व त्याच्या घरी रात्रभर मुक्काम करणे वाढत गेले. त्यामुळे नामदेवची चिंता वाढली. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तिने काहीच ऐकले नाही. ती विविध बहाणे व लपवाछपवी करून पोलीस अधिकाऱ्याच्या घरी जात होती. तेथे मुक्काम करीत होती. नामदेवने विचारणा केल्यानंतर त्याला उडवाउडवीची उत्तरे देत होती. नामदेवने जाब विचारणे वाढवल्यानंतर सुरेखाने त्याच्याविरुद्ध ११ मे २००७ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तेव्हापासून दोघेही वेगळे राहायला लागले. परिणामी, नामदेवने मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळवण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाने ती याचिका मंजूर केल्यामुळे सुरेखाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता सदर निरीक्षण नोंदवून तिचे अपील फेटाळून लावले.

मुलींनी घेतली वडिलाची बाजू

नामदेवची बाजू दोन्ही मुलींनी उचलून धरली. नामदेवने सुरेखावर केलेले आरोप खरे असल्याचे बयाण मुलींनी दिले. त्यामुळे नामदेवच्या याचिकेला बळ मिळाले. सुरेखाची कृती क्रूरतापूर्ण आहे. तिचे संबंधित वागणे सामान्य स्वरूपाच्या वागण्यामध्ये मोडत नाही, असेही उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

Web Title: The wife's frequent stay at the other man's house is a trauma for the husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.