पतीची संशयी वृत्ती, सततची मारहाण; विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 12:07 IST2022-02-16T11:47:41+5:302022-02-16T12:07:05+5:30
रवी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी आला. राणी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली. शिवाय, जिवे मारण्याची धमकी देऊन ताे निघून गेला.

पतीची संशयी वृत्ती, सततची मारहाण; विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयी वृत्तीच्या पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. पती पुन्हा मारहाण करेल, या भीतीपाेटी पत्नीने उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आत्महत्या केली. ही घटना बुटीबाेरी येथे साेमवारी (दि. १४) सायंकाळी उघडकीस आली. आराेपी पती फरार असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
राणी रवी उंबरकर (वय २५) असे मृत पत्नीचे, तर रवी पुंडलिक उंबरकर (३२, रा. तलमले लेआऊट, बुटीबाेरी, ता. नागपूर ग्रामीण) असे आराेपी पतीचे नाव आहे. रवी मूळचा केळापूर, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून, ताे बुटीबोरी येथील सलूनमध्ये कामाला असल्याने शहरात पत्नीसह राहायचा. राणीचे वडील देहूरवाडी, ता. आर्णी, जि. यवतमाळ येथील रहिवासी असून, तेदेखील बुटीबाेरी येथील सिडको कॉलनीतील डॉ. भजनी यांच्या प्लॉटवर झोपडीत राहतात.
राणी व रवी तिच्या आईकडे गेले हाेते. दाेघेही साेमवारी त्यांच्या घरी परत येणार हाेते. मात्र, रवी व तिचे आईवडील कामानिमित्त निघून गेल्याने ती एकटीच घरी हाेती. रवी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी आला. राणी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली. शिवाय, जिवे मारण्याची धमकी देऊन ताे निघून गेला. रवी पुन्हा मारहाण करील या भीतीमुळे तिने घरी असलेले उंदीर मारण्याचे विषारी औषध खाल्ले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३०६, ३२४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत भाेयर करीत आहेत.
मारहाणीच्या खुणा
राणीच्या शरीर व डाेक्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत हाेत्या, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली असून, पाेलिसांनी याला दुजाेरा दिला आहे. आई सायंकाळी घरी परतल्यावर तिला राणी रडत असल्याचे दिसले. चाैकशीअंती तिने आईला विषारी औषध खाल्ल्याचे सांगितले. आईने तिला लगेच डाॅक्टरकडे नेले. मात्र, डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले.