घरी परत नांदायला चल... दारुड्या नवऱ्याकडून पत्नी व सासूवर चाकूने जीवघेणे वार

By योगेश पांडे | Updated: October 6, 2023 17:08 IST2023-10-06T17:08:04+5:302023-10-06T17:08:45+5:30

पारडीत भरदिवसा थरार

Wife and mother-in-law fatally stabbed by drunken man | घरी परत नांदायला चल... दारुड्या नवऱ्याकडून पत्नी व सासूवर चाकूने जीवघेणे वार

घरी परत नांदायला चल... दारुड्या नवऱ्याकडून पत्नी व सासूवर चाकूने जीवघेणे वार

नागपूर : दुसऱ्या नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून माहेरी परत गेलेल्या पत्नीसोबतच तिच्या आईवर त्याने जीवघेणे वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीला घरी परत चलण्याचा आग्रह करणाऱ्या नवऱ्यात सैतान संचारला व त्याने हा प्रकार केला. यामुळे पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडाली होती.

राजेंद्र शाहू (२८, डिप्टी सिग्नल, दुर्गा माता चौक) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे एप्रिल महिन्यात दुलेश्वरी (२८) हिच्याशी लग्न झाले होते. तिची आई पारडीतील शिवनगरात राहते. दुलेश्वरी हिचे २०१७ साली एका व्यक्तीशी लग्न झाले होते. मात्र त्याचा ह्रद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर तिने राजेंद्रशी दुसरे लग्न केले. राजेंद्रला दारूचे व्यसन होते व यामुळे दुलेश्वरी प्रचंड कंटाळली होती. त्याला शिवीगाळ व मारहाणीला त्रासून तिने त्याचे घर सोडले आणि ती माहेरी जाऊन रहायला लागली.

गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास राजेंद्र दारूच्या नशेत त्याच्या सासरी गेला व त्याने दुलेश्वरीला परत नांदायला चल म्हणून आग्रह करण्यास सुरुवात केली. तिने त्याला विरोध केला व तिची आई जानकी शाहू (४५) हिनेदेखील त्याला अशा वागण्याचा जाब विचारला. यावरून राजेंद्र चिडला व त्याने खिशातून चाकू काढून अगोदर सासूच्या छाती व हातावर वार केले. त्यानंतर आईला वाचवायला आलेल्या दुनेश्वरीच्या पाठीवर चाकूने वार केले. दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. दुलेश्वरीच्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाण्यात राजेंद्रविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Wife and mother-in-law fatally stabbed by drunken man