रक्तचाचणीला पैसे कशाला मोजता? ‘एचएलएल’च्या महालॅबमध्ये होतेय मोफत तपासणी
By सुमेध वाघमार | Updated: March 10, 2023 08:00 IST2023-03-10T08:00:00+5:302023-03-10T08:00:16+5:30
Nagpur News आरोग्य विभागाच्या ‘एचएलएल’च्या महालॅबशी झालेल्या करारामुळे मागील दोन महिन्यांत ६२ हजार ७९३ रुग्णांची तर एकट्या मेडिकलमध्ये याच कालावधीत ३ लाख ७४ हजार ४१८ अशा एकूण ४ लाख ३७ हजार २११ रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

रक्तचाचणीला पैसे कशाला मोजता? ‘एचएलएल’च्या महालॅबमध्ये होतेय मोफत तपासणी
नागपूर : रक्ताची तपासणी करण्यासाठी खासगी लॅबमध्ये भरपूर पैसे मोजावे लागतात. मात्र, आरोग्य विभागाच्या ‘एचएलएल’च्या महालॅबशी झालेल्या करारामुळे मागील दोन महिन्यांत ६२ हजार ७९३ रुग्णांची तर एकट्या मेडिकलमध्ये याच कालावधीत ३ लाख ७४ हजार ४१८ अशा एकूण ४ लाख ३७ हजार २११ रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी म्हणजे आजाराचे निदान. आरोग्य विभागाने त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी ‘महालॅबशी’ करार केला आहे. तर मेडिकलमध्ये ‘पॅथेलॉजी’, ‘मायक्रोबायोलॉजी’ व ‘बायोकेमिस्ट्री लॅब’ आहेत. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाच्या सर्वच रुग्णालयांसह मेडिकलमधील ओपीडीत येणाऱ्या रुग्णांसह उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे गरजू व नियमात बसणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी मोफत होते, तर इतरांना शासकीय शुल्क मोजावे लागते.
- मेडिकलमध्ये दोन महिन्यांत ३ लाख ७४ हजार तपासण्या
मेडिकलमध्ये जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तिन्ही लॅब मिळून ३ लाख ७४ हजार ४१८ रुग्णांच्या विविध तपासण्या झाल्या. यात बायोकेमिस्ट्री लॅबमधून २ लाख ५९ हजार ७८२, मायक्रोबायोलॉजी लॅबमधून ६०,६७२ तर पॅथेलॉजी लॅबमधून ५३ हजार ९६४ रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.
- आरोग्य विभागाकडून ६२ हजार ७९३ तपासण्या
आरोग्य विभागाच्या ‘महालॅबमधून’ जानेवारी महिन्यात २८ हजार ५८८ तर फेब्रुवारी महिन्यात ३४ हजार २०५ अशा एकूण ६२ हजार ७९३ तपासण्या झाल्या.
- बेसिक चाचण्यांवर विशेष भर
आरोग्य विभागात ‘सीबीसी’, ‘बीएसआर’, ‘मलेरिया’, ‘डेंग्यू’, ‘यूपीटी’ यासह ‘केएफटी’, ‘एलएफटी’, ‘थायरॉइड’, ‘मधुमेह’ यासह विविध प्रकारच्या तपासण्या होतात. रक्त तपासणीतून अनेक आजारांचे निदान होण्यास मदत होते.
-‘थायरॉइड’सह ‘सीबीसी’ चाचण्यांची संख्या अधिक
‘महालॅब’मधून जानेवारी महिन्यात थायरॉइडच्या १० हजार ३७० तर ‘कम्प्लीट ब्लड काऊंट’च्या (सीबीसी) व हिमोग्लोबीनच्या १९ हजार ९९७ चाचण्या करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात थायरॉइडच्या १३ हजार २९५ तर ‘सीबीसी’ व हिमोग्लोबीनच्या २५ हजार २२९ चाचण्या करण्यात आल्या.
आजाराचे लवकर निदान होऊन उपचारात गती यावी, यासाठी मेडिकलच्या ‘पॅथेलॉजी’, ‘मायक्रोबायोलॉजी’ व ‘बायोकेमिस्ट्री लॅब’मध्ये अद्ययावत उपकरणे उपलब्ध आहेत. बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या सोयीसाठी ‘सेंट्रल पॅथेलॉजी लॅब’ आहे. २४ बाय ७ या तिन्ही लॅब सुरू असतात. याचा फायदा सर्वच स्तरातील रुग्णांना होतो.
- डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर