तू माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज का केला? लूटमारीची नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 09:37 PM2021-08-28T21:37:50+5:302021-08-28T21:38:14+5:30

Nagpur News गर्लफ्रेंडला मेसेज केल्याचा आरोप लावून तिघांनी एका व्यक्तीचा ३० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास सीताबर्डीत ही घटना घडली.

Why did you text my girlfriend A new form of looting | तू माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज का केला? लूटमारीची नवी शक्कल

तू माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज का केला? लूटमारीची नवी शक्कल

googlenewsNext

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गर्लफ्रेंडला मेसेज केल्याचा आरोप लावून तिघांनी एका व्यक्तीचा ३० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास सीताबर्डीत ही घटना घडली.

वैभव विनोदराव ठाकरे (वय ३५) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. ते मनीषनगर, जयंतीनगरीत राहतात. इंटेरियर डेकोरेटर म्हणून काम करणारे ठाकरे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास प्राजक्त करमरकर नामक व्यक्तीच्या वाहनातून अमरावतीहून परत आले. व्हेरायटी चाैकातून ऑटो थांब्याकडे जात असताना त्यांना दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी अडवले. त्यातील एकाने ठाकरे यांना ‘तू माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज का केला’, अशी विचारणा केली. काहीच संबंध नसल्याने ठाकरे काही वेळेसाठी भांबावले. कोणती प्रेयसी, कसला मेसेज अशी विचारणा त्यांनी आरोपींना केली. तेव्हा एकाने शिवीगाळ करून मला तुझा मोबाइल चेक करायचा आहे, असे म्हणत त्याला मोबाइल मागितला. ठाकरेंनी नकार दिला असता एका आरोपीने दुसऱ्याला ‘काढ रे शस्त्र’ असे म्हणत शस्त्र काढले आणि ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी ठाकरेंनी आरोपींना आपला मोबाइल चेक करण्यासाठी दिला. तो हातात घेताच आरोपी पळून गेले. ठाकरेंनी या प्रकरणाची तक्रार सीताबर्डी ठाण्यात नोंदवली. सहायक निरीक्षक सुनील सोनोने यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

गुन्हेगार निर्ढावले

मध्यरात्रीनंतर दोन-अडीच तास सोडले तर सीताबर्डीच्या परिसरात सारखी वर्दळ असते. अशा ठिकाणी ही लूटमारीची घटना घडल्याने गुन्हेगार निर्ढावल्याचे बोलले जात आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Why did you text my girlfriend A new form of looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.