का झाला 'त्या' चार मातां मृत्यू ? गूढ वाढले; २५ औषधी तपासणीच्या फेऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:21 IST2025-11-04T16:20:10+5:302025-11-04T16:21:27+5:30
Nagpur : लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत एकही माता मृत्यूची नोंद नसताना, अचानक ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांचा मृत्यू झाला.

Why did 'those' four mothers die? Mystery grows; 25 in drug test round
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. रुग्णालयातील २५ औषधी तपासणीच्या फेऱ्यात आली आहेत. यासाठी खुद्द हॉस्पिटलने या औषधी तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासनाला (एफडीए) सोमवारी पत्र दिले.
लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत एकही माता मृत्यूची नोंद नसताना, अचानक ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने स्वतः या मृत्यूची नोंद जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात केल्यानंतर, तातडीने डॉ. श्रीराम गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली.
समितीने ३१ ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलला भेट दिली. प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया गृहातील जीवाणू संसर्गाची तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्याचे निर्देश दिले. यात शस्त्रक्रिया गृहातील उपकरणांपासून ते टेबलचा वरचा भाग, प्रकाश दिवे आणि भिंती यांसारख्या विविध पृष्ठभागांवर जीवाणू किंवा सूक्ष्मजीव आहेत की नाहीत याची तपासणी होणार आहे. या शिवाय, मृत मातांना दिलेल्या औषधांची तपासणी करण्याची सूचनाही समितीने दिल्या. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाने दोन दिवस उशिरा का होईना ३ ऑक्टोबर रोजी 'एफडीए'ला पत्र लिहून तब्बल २५ औषधांचे नमुने तपासण्याची विनंती केली. या औषधांच्या गुणवत्तेतून मृत्यूचे कारण समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'एफडीए'ची मयार्दा; चारच औषधांचे नमुने घेणार?
हॉस्पिटलने २५ औषधांच्या तपासणीची विनंती केली असली तरी, अन्न व औषध प्रशासनाने यावर तांत्रिक अडचण उपस्थित केली आहे.
'एफडीए'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही चारपेक्षा जास्त औषधांची तपासणी करू शकत नाही.
त्यामुळे, उद्या मंगळवारी 3 'एफडीए'चे पथक २५ पैकी नेमक्या कोणत्या ४ औषधांचे नमुने तपासणीसाठी निवडते आणि या नमुन्यांच्या अहवालातून या दुर्दैवी मृत्यूंमागील सत्य समोर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.