संघाला सुरक्षा कशाला आणि किती खर्च होतो? हायकोर्टाचे राज्य माहिती आयोगाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:47 IST2025-10-16T18:46:29+5:302025-10-16T18:47:13+5:30
Nagpur : यासंदर्भात लालन किशोर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली.

Why and how much does the security of the RSS cost? High Court directs the State Information Commission
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कशाच्या आधारावर सुरक्षा पुरविली जाते आणि या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो, याची माहिती मागणाऱ्या अर्जावर कायद्यानुसार निर्णय द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाला दिले आहेत.
यासंदर्भात लालन किशोर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. सिंग यांनी ३० जून २०२१ रोजी गृह विभागाला माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज सादर करून ही माहिती मागितली होती. त्यानंतर संबंधित अर्ज आधी राज्य गुप्तचर विभागाकडे व पुढे नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, विशेष शाखा पोलिस उपायुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली जाऊ शकत नसल्याचे सिंग यांना कळविले. त्यानंतर प्रथम व द्वितीय अपीलमध्येही त्यांची मागणी मंजूर झाली नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कायद्यानुसार नोंदणी झाली नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक निधीतून सुरक्षा पुरविली जाऊ शकत नाही, असे सिंग यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने द्वितीय अपीलमध्ये दिलेला निर्णय उच्च न्यायालयाला अयोग्य आढळून आला. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण आयोगाकडे परत पाठवून वरीलप्रमाणे निर्देश दिले व ही याचिका निकाली काढली.