मिलिटरी आॅपरेशनची माहिती देणारा कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:49 IST2018-11-16T00:47:42+5:302018-11-16T00:49:03+5:30
मिलिटरी इंटेलिजन्समधून मेजर पंकज बोलतो, तुमच्याकडे आयएसआय एजंट पकडण्यासाठी आॅपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पंकज येरगुडेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिकडे कांगडा (हिमाचल प्रदेश) मध्ये त्याला अटकही झाली आहे. मात्र, ज्याने फोन केला तो आवाज आणि पंकजच्या आवाजात साम्य नाही. त्यामुळे पंकजच्या मोबाईलचा गैरवापर करण्यात आला किंवा मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. परिणामी एमआय आॅपरेशनला नवी कलाटणी मिळाली आहे.

मिलिटरी आॅपरेशनची माहिती देणारा कोण ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिलिटरी इंटेलिजन्समधून मेजर पंकज बोलतो, तुमच्याकडे आयएसआय एजंट पकडण्यासाठी आॅपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पंकज येरगुडेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिकडे कांगडा (हिमाचल प्रदेश) मध्ये त्याला अटकही झाली आहे. मात्र, ज्याने फोन केला तो आवाज आणि पंकजच्या आवाजात साम्य नाही. त्यामुळे पंकजच्या मोबाईलचा गैरवापर करण्यात आला किंवा मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. परिणामी एमआय आॅपरेशनला नवी कलाटणी मिळाली आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका धार्मिक स्थळाच्या परिसरातून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत सॅटेलाईटद्वारा वारंवार संपर्क करण्यात येत असल्याचा फोन गणेशपेठ पोलीस ठाण्यात आला होता. हा फोन करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक पंकज येरगुडेचा आहे. फोन करणारानेही स्वत:चे नाव मेजर पंकज सांगितले होते. त्याच्या या फोनने केवळ गणेशपेठ पोलीसच नव्हे तर शहरासह राज्यातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबरच्या रात्री एमआयने भालदरपुरा येथून दोन संशयितांना तर ९ नोव्हेंबरला एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतल्याची माहिती सर्वत्र पसरली. नागपूर पोलिसांनी या वृत्ताचे खंडण केले . दरम्यान, या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली असल्यामुळे एमआयनेही त्याची चौकशी केली. ज्या भ्रमणध्वनीवरून फोन करण्यात आला त्याचे लोकेशन हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे दिसले. ज्याच्याकडे हा मोबाईल होता, तो पंकज येरगुडे सैन्यदलात रसद पुरवठा विभागाच्या योल येथील छावणीत शिपाई पदावर कार्यरत आहे. त्याला एमआयकडून अटक करण्यात आली. इकडे नागपूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर एमआयच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क करून पंकज व संबंधित अधिकाऱ्यांचे बोलणे करून दिले. मात्र, पूर्वी आलेला आवाज आणि या आवाजात साम्य नसल्याचे जाणवले. त्यामुळे पंकजच्या मोबाईलचा गैरवापर झाला किंवा मोबाईल क्रमांक हॅक करून दुसऱ्या व्यक्तीने नागपूर पोलिसांची दिशाभूल केली असावी, अशी शंका निर्माण झाली आहे.परिणामी या प्रकरणाला पुन्हा नाट्यमय कलाटणी मिळाली असून, पोलीस आता त्याची चौकशी करीत आहेत. या संबंधाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलीस पथक हिमाचल प्रदेशला देखिल रवाना करणार असल्याचे सांगितले.