नरखेड : गतवर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील ५७ शेतकऱ्यांनी महाबीज व इतर कंपन्यांनी निर्मित सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली होती. त्यामध्ये ३१ शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे तर उर्वरित शेतकऱ्यांनी खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली होती. या शेतकऱ्यांच्या शेतातील पेरणी केलेले सोयाबीन बियाण्यांची उगवण झालीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन अडचणीच्या वेळी आर्थिक फटका बसला होता. उगवण न झालेल्या बियाण्यांची व त्यामुळे होऊ न शकलेल्या सोयाबीनच्या उत्पादनाची नुकसान भरपाई महाबीज व खासगी कंपनीने द्यावी, अशा तक्रारी ५७ शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी याच्याकडे केल्या होत्या. तालुका कृषी अधिकारी यांनी या सर्व बाबीची चौकशी करून शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी बियाणे व झालेली नुकसान भरपाई संबंधितांनी त्वरित द्यावी असे आदेशही देण्यात आले होते. त्यापैकी २६ शेतकऱ्यांना खासगी कंपनीने नुकसान भरपाई अदा करीत कमी कालावधीत उत्पन्न देणारे सोयाबीनचे बियाणेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु शासनाच्याच महाबीज महामंडळाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
-
मागील वर्षीच्या खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली होती. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसुद्धा अदा करण्यात आली आहे. काहीची प्रक्रियेत आहे. परंतु यावर्षी सोयाबीनची पेरणी करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहावी तरच पेरणी करावी. उगवण क्षमता कमी असल्यास कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. शेतकऱ्यांनी कोणत्याही बियाण्यांच्या पेरणीबाबत बेफिकीर राहू नये.
- डॉ. योगीराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड