सहलीची बस रात्री घाटात बंद पडते तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:54 IST2020-02-11T19:53:05+5:302020-02-11T19:54:58+5:30
नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली.

सहलीची बस रात्री घाटात बंद पडते तेव्हा...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नरखेड) : नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली. कोणतीही मदत मिळत नसल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली. इकडे मुले परत आली नसल्याने पालकही धास्तावले होते. शिक्षकांनी राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्याशी संपर्क केला. सलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला विनंती केली. शेवटी सर्व विद्यार्थी रात्री २ वाजता सुखरूप बेलोना येथे पोहोचले.
बेलोना येथील मातोश्री सुमनबाई आश्रम शाळेचे ५४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक हे सोमवारी सकाळी चिखलदरा येथे सहलीकरिता निघाले. यासाठी त्यांनी काटोल आगाराची बस बुक केली होती. दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर सर्व जण परतीच्या प्रवासासाठी निघाले. चिखलदरा येथून काही अंतरावर येताच बस बंद पडली. रात्रीची वेळ आणि घनदाट जंगल यामुळे सर्वच भयभीत झाले. मदतीसाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. परंतु कोणतीही मदत मिळत नव्हती. शेवटी शिक्षकांनी सलील देशमुख यांच्यासोबत संपर्क केला. सलील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी तसेच चिखलदऱ्याचे पोलीस निरीक्षक शिंदे व परतवाड्याचे पोलीस निरीक्षक मानेकर यांच्यासोबत संपर्क केला. यानंतर तातडीने चिखलदऱ्याचे ठाणेदार शिंदे यांनी घाटात अडकलेली बस गाठली. ज्या ठिकाणी ही बस अडली होती त्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरे राहतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलीस वाहनांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना परतवाडाकडे रवाना केले. तोपर्यंत देशमुख यांनी काटोल आगारप्रमुख डी.एम. रंगारी व परतवाडाचे आगारप्रमुख बालदे यांना सांगून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यास सांगितले. परतवाडा येथे पोहचल्यानंतर देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व विद्यार्थी सुखरूप बेलोना येथे पोहचले.