...जेव्हा नाती रक्तरंजित होतात! अलीकडच्या काळात रक्तांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या हत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:57 IST2025-05-05T13:56:04+5:302025-05-05T13:57:14+5:30
Nagpur : यवतमाळ शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून केलेला खून, गडचिरोलीत वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाची जंगलात लावलेली विल्हेवाट तसेच गोंदियात कौटुंबिक वादातून वडिलानेच केलेला मुलाचा खून.

...When relationships turn bloody! The increasing number of murders between blood relatives in recent times is alarming.
राजेश शेगोकार
नागपूर : नातं हे केवळ रक्ताचेच नसते, तर प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे असतं. जेव्हा या तिन्ही गोष्टी हरवतात, तेव्हा नातं फक्त नावापुरते उरतं, त्यामधूनच मग वाद, विसंवाद, हेवेदावे होतात अन् त्याची परिसीमा गाठली की रक्ताची नातीसुद्धा रक्तरंजित होतात. यवतमाळ शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून केलेला खून, गडचिरोलीत वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाची जंगलात लावलेली विल्हेवाट तसेच गोंदियात कौटुंबिक वादातून वडिलानेच केलेला मुलाचा खून. गेल्या आठवड्यातील या ठळक घटना, अलीकडच्या काळात रक्तांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या अशा हत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. मायेचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा किल्ला मानल्या जाणाऱ्या घरात रक्ताच्याच नव्हे तर इतर नात्यातही गोडवा होता; पण आताच्या काळात त्याच घरातली सख्खी नाती एकमेकांचे जीव घेताना दिसत आहेत. ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, तर एका सामाजिक अधःपतनाचं स्पष्ट लक्षण आहे.
बदलत्या काळातील धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे. पूर्वी जिथे एकत्र कुटुंबात एकमेकांचा आधार होता, तिथे आता विभक्त कुटुंबात माणसं एकटी पडत चालली आहेत. मोबाइल, सोशल मीडिया आणि टीव्हीवरच्या नात्यांचं अतिरंजित नाटकीकरण यामुळे खरी नाती फक्त नावापुरती उरली आहेत. संवादाच्या जागी मेसेज आणि सहवासाच्या जागी स्क्रीन आली आहे. जवळ असूनही अंतर वाढलं आहे. ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे मनातली खदखद बाहेर येण्याऐवजी आतच साठते आणि तीच एका क्षणी हिंसक रूप घेत असल्याचं दिसतं.
काही घटनांमागे पैशासाठी, संपत्तीच्या वादासाठी किंवा स्वार्थासाठी नात्यांचा बळी दिला जातो तर काही हत्यांमागे वाढती व्यसनाधीनता व ती पूर्ण करण्याकरिता असणारी पैशांची गरज दिसत आहे. काहींना वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्यात येणारे अपयश, स्पर्धेची भीती, विश्वासघात अशा अनेक कारणांमधून मग अनेकांना तणाव, नैराश्य, रागावर नियंत्रण न राहणं, अशा समस्या उद्भवतात ज्याचा उद्रेक कधी-कधी हिंसक होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य हेही यामागचं एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे. अशा वेळी हा प्रश्न केवळ व्यक्तीचा न राहता कौटुंबिक व सामाजिक होतो. अशा हिंसक प्रवृत्तीच्या कारणांची उत्तरे पोलिसांत किंवा कोर्टात पूर्णपणे मिळणार नाहीत तर त्याचा शोध घरातून सुरू व्हायला हवा. समुपदेशन, संवाद, सहनशीलता या उपचारांमध्ये आपलेपणाची ओल टिकवून ठेवायला हवी, त्यामुळे आज सर्वाधिक गरज आहे ती नात्यांना घट्ट पकडून ठेवण्याची, संवाद साधण्याची आणि रागाच्या क्षणी थांबून विचार करण्याची.
नाती कमावणे सोपं आहे; पण ती जपणं ही खरी कला आहे. प्रेम, विश्वास आणि संवादाची नाळ तुटली की, रक्ताची नातीसुद्धा रक्तरंजित होतात. समाज म्हणून आपण जर वेळेवर सावध झालो नाही, तर उद्याचं चित्र अजून भयावह असेल. घराचे दरवाजे बंद करणे सोपे असते; पण मनाचा दरवाजा उघडा ठेवणं फार महत्त्वाचं आहे, तो जोवर उघडा राहील तोवर अनेक प्रेमाची नाती प्रवेश करतील, आनंद देतील त्यामुळे तो दरवाजा बंद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.. फक्त दरवाजा दोन्ही बाजूंनी उघडणारा असावा!