विदर्भात वादळाच्या तडाख्याने गहू भुईसपाट, झाडेही कोसळली; बाजार समितीतील लाखोंच्या नुकसानीची जबाबदारी कुणाची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:52 IST2026-02-24T19:45:48+5:302026-02-24T19:52:04+5:30

Nagpur : रविवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या वादळी पावसाने नागपूरकरांना हादरवून सोडले. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वादळामुळे शहरातील अनेक भागांत मोठी झाडे उन्मळून पडली, वीजतारा तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला.

Wheat fields and trees were destroyed by the storm in Vidarbha; Who is responsible for the loss of lakhs in the market committee? | विदर्भात वादळाच्या तडाख्याने गहू भुईसपाट, झाडेही कोसळली; बाजार समितीतील लाखोंच्या नुकसानीची जबाबदारी कुणाची ?

Wheat fields and trees were destroyed by the storm in Vidarbha; Who is responsible for the loss of lakhs in the market committee?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
रविवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या वादळी पावसाने नागपूरकरांना हादरवून सोडले. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वादळामुळे शहरातील अनेक भागांत मोठी झाडे उन्मळून पडली, वीजतारा तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. कळमना मार्केट यार्डात उघड्यावर ठेवलेला लाखो रुपयांचा शेतमाल पावसात भिजल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सोमवारी दुपारपर्यंतही अनेक भागांतील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नव्हता. पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांत तापमान वाढ झाली आहे. रविवारीही दिवसभर उन्हाचे चटके सहन करावे लागले होते. मात्र वातावरणाने मध्यरात्री कूस बदलली आणि वेगाने वारे वाहू लागले. या वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू झाला. पहाटे ४ वाजल्यापासून जोरदार सरींनी पावसाला सुरुवात झाली. एक-दीड तास वादळी पाऊस सुरू होता. सकाळी ६ वाजेपर्यंत वातावरण शांत झाले. वादळामुळे वर्धा रोडवर सोमलवाडा परिसरात मुळीक कॉम्प्लेक्ससमोर एक मोठे झाड या ठिकाणी उभ्या असलेल्या कारवर कोसळले. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. दुपारपर्यंत अग्निशमन विभागाच्या पथकाने पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. इतरही ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

अपुरे गोदाम, लाखोंच्या नुकसानची जबाबदारी कुणाची ?

नागपुरात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराचे वाभाडे निघाले. उघड्यावर ठेवलेला शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल पावसात भिजल्याने शेतकऱ्यांसह खरेदीदारांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. 'गोदामे अपुरी आणि धान्य उघड्यावर' अशा गंभीर परिस्थितीमुळे आता संताप व्यक्त केला जात आहे. कळमना मार्केटच्या आवारात विक्रीसाठी आलेला गहू, चणा, तूर आणि सोयाबीनची मोठी आवक झाली होती. मात्र, पुरेशी साठवणूक व्यवस्था नसल्याने हे धान्य उघड्यावरच पडून होते. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सावरायला वेळच मिळाला नाही, परिणामी लाखो रुपयांचे धान्य भिजले. पावसाचा फटका केवळ स्थानिक शेतकऱ्यांनाच बसला नाही, तर खरेदी केलेल्या मालाचे उघड्यावर वजन करणाऱ्या व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले.

हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची, तुरीचेही नुकसान

वादळी पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसला. वादळामुळे आंब्याचा मोहर गळाला. भिवापूर तालुक्यातील बेसूर, नांद, पिराया, नाड, चिखलापार, पांजरेपार, पिरावा शिवारात सोमवारी दुपारी ४ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसामुळे शेतातील गव्हाचे उभे पीक अक्षरशः आडवे पडले. या पावसामुळे गव्हासोबत हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची, तुरी या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

विजेचे खांब वाकले, अनेक फीडर ब्रेकडाऊन

मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी पावसामुळे शहरात वीज संकट निर्माण झाले. दक्षिण-पश्चिम नागपूर सर्वाधिक प्रभावित झाले. सोमलवाडा उपविभागात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. काही विजेचे खांब वाकले, तर कंडक्टरचे इन्सुलेटर फुटले. यामुळे अनेक फीडर ब्रेकडाऊन झाले आणि मोठ्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या माहितीनुसार, महानगरपालिकेला पडलेली झाडे हटवण्यास वेळ लागल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात विलंब झाला. कर्वेनगरमधील २५ ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी दुपारनंतरच सुरू झाला. सोनेगावमधील समर्थनगर परिसरात अनेक तास वीज नव्हती. तसेच विमानतळ परिसरातील भागांमध्येही बराच काळ अंधार होता. मनीषनगरमधील अनेक नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.

Web Title : विदर्भ में तूफान से गेहूं बर्बाद; बाजार नुकसान का जिम्मेदार कौन?

Web Summary : विदर्भ में तूफान ने गेहूं की फसल को तबाह कर दिया, पेड़ उखड़ गए। नागपुर के बाजार में बारिश से भीगे अनाज के कारण भारी नुकसान हुआ। बिजली गुल और क्षतिग्रस्त बुनियादी ढांचे ने अराजकता बढ़ा दी, जिम्मेदारी पर सवाल उठे।

Web Title : Storms Flatten Wheat in Vidarbha; Who's Responsible for Market Loss?

Web Summary : Vidarbha hit by storms, flattening wheat crops and uprooting trees. Nagpur's market faced huge losses due to rain-soaked produce. Power outages and damaged infrastructure added to the chaos, raising questions about responsibility.