"चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन ठोकून दिले तर काय करता ?" बच्चू कडूंची मुंबईत न जाण्याची भूमिका कायम
By योगेश पांडे | Updated: October 29, 2025 17:39 IST2025-10-29T17:02:18+5:302025-10-29T17:39:30+5:30
जनता वेठीस, मात्र कडूंचे वेगळेच बोल : जर पोलिसांनी आमची वाहने अडविली तर वेगळा विचार करण्याचा इशारा

"What would you do if a chartered flight called you and you refused?" Bachchu Kadu maintains his stance of not going to Mumbai
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे नागरिक अक्षरश: वेठीस धरले गेले आहेत. हे आंदोलन थांबविण्यात यावे यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील कडू यांना विनंती केली. मात्र कडू यांनी मुंबईत चर्चेसाठी जाणार नाही, सरकारच्या मंत्र्यांनी नागपुरात येऊन चर्चा करावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी कायम होती.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकारी अधिकारी तसेच काही मंत्र्यांनी कडू यांना फोन लावला. मात्र कडू यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर गिरीश महाजन यांचा फोन त्यांनी उचलला. आंदोलन सोडून चर्चेसाठी मुंबईला येणार नाही, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. मुंबईला येण्याजाण्यात एक दिवस जाईल. त्या कालावधीत इथे आंदोलकांसोबत दगाफटका होण्याची भिती आहे. जी चर्चा आहे ती नागपुरातच व्हावी. अनेक विषयांची तर मुख्यमंत्र्यांशी अगोदरच चर्चा झाली आहे. केवळ शासन निर्णय जारी करायचे आहेत. असे कडू म्हणाले.
चंद्रपूरमध्ये नागपुरच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांची वाहने अडविण्यात आल्याची माहिती आली आहे. जर ही वाहने सोडली नाही तर आम्हाला आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याबाबत विचार करावा लागेल असा इशारा कडू यांनी दिला. या आंदोलनामुळे लोक वेठीस धरले गेले आहे. याबाबत कडू यांना विचारणा केली असता लोकांना वेठीस धरण्याची आमची मानसिकता नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन ठोकून दिले तर काय करता ?
काहीही झाले तरी आम्ही आंदोलन थांबवू शकत नाही. बाकी आंदोलनात ऑन द स्पॉट निर्णय घेतला गेला. मात्र आम्हाला मुंबईला बोलविण्याचा आग्रह संशयास्पद आहे. आम्हाला चार्टर्ड फ्लाईटने बोलविले आणि ठोकून दिले तर काय करता असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.