राऊतांच्या पुस्तकाने काय होणार ? शिवसेना-कॉंग्रेस लवकरच संपणार
By योगेश पांडे | Updated: May 16, 2025 16:28 IST2025-05-16T16:27:32+5:302025-05-16T16:28:50+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : कामठीत तिरंगा यात्रेचे आयोजन

What will happen to Raut's book? Shiv Sena-Congress will end soon
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र राऊत यांच्या पुस्तकाने नेमके काय होणार हेच आम्हाला समजत नाही. यातून राऊत व शिवसेनेची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येत आहे. २०१९ मध्ये केलेली चूक शिवसेनेला बरबाद करत आहे. शिवसेना संपणार आहे व कॉंग्रेसचेदेखील लवकरच अध:पतन होईल असेच चित्र असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ कामठीत शुक्रवारी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी व गृहमंत्र्यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली आहे. मात्र तरीदेखील असे आरोप केले असतील तर तो न्यायालयाचा अवमान आहे. राऊत यांची चौकशी झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे. पुस्तकाचे नाव नरकातील स्वर्ग ऐवजी नरकातील राऊत असे ठेवायला हवे. दुसरीकडे कॉंग्रेस दिशाहीन पक्ष झाला आहे. गावातील कार्यकर्त्यांनादेखील पक्ष नको असे वाटते. संग्राम धोपटे यांचा कॉंग्रेसने अपमान केला. पुढील काळात तेथील अनेक लोक महायुतीत येतील व महाविकास आघाडीचे अनेक तुकडे होतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
अवकाळी पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणार
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. मदत पुनर्वसन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात काही ठिकाणी वाळू माफिया मुजोर झाले आहेत. सीसीटीव्हीचे सर्व्हेलन्स वाढविण्यात येईल व वाळू माफियांचे कंबरडे मोडण्यावर भर असेल असे बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यभरात पंधराशेहून अधिक तिरंगा यात्रा
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राज्यभरात पंधराशेहून अधिक तिरंगा यात्रा आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. १६ ते २० मे दरम्यान हे आयोजन होईल. जनता सशस्त्र दलांसोबत असल्याचा संदेश त्यातून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.