देवेंद्र फडणवीसांशी आता काय कुस्ती करू? अजित पवार यांचा मिश्कील सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 06:24 IST2022-12-28T06:24:07+5:302022-12-28T06:24:51+5:30

जिथे विरोध करायचा तिथे तो आम्ही करतच असतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

what to wrestle with devendra fadnavis now asked ncp ajit pawar | देवेंद्र फडणवीसांशी आता काय कुस्ती करू? अजित पवार यांचा मिश्कील सवाल

देवेंद्र फडणवीसांशी आता काय कुस्ती करू? अजित पवार यांचा मिश्कील सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू... का मारामारी करू... अहो, शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. म्हणजे काय गूळपीठ असते का.... जिथे विरोध करायचा तिथे तो आम्ही करतच असतो, असे अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. 

सुयोग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढली आहे काय या प्रश्नावर त्यांनी आता त्यांच्याशी मी काय कुस्ती करू की हाणामारी करू, असा मिश्कील सवाल केला. 

जयंत पाटील यांच्या निलंबनप्रकरणी मवाळ भूमिका घेतल्याबद्दल शरद पवार यांनी फोन करून अजित पवार यांना जाब विचारला, अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याबद्दल मंगळवारी सकाळी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक वार्तालापाच्या वेळी विचारले असता अजित पवार उसळले आणि म्हणाले, अजित पवार अजित पवार आहे आणि तो कुणाच्या बापालाही भीत नाही. परवा जयंत पाटील यांचे निलंबन झाल्यानंतर सभागृहातून सभात्याग करून आम्ही सगळे खाली आलो. त्यावेळी एक फोन आला आणि पवार साहेबांचा फोन आहे, असे मला सांगितलेले कोणी तरी टीव्हीवाल्याने ऐकून बातमी दिली की पवार साहेबांनी मला झापले. 

साहेबांनी मला सभागृहात काय झाले हे विचारले आणि माहिती घेतली, पण लोक बातम्या देतात तर प्रत्येकाला जाऊन खुलासे करायचे का...,अशी विचारणाही अजित पवार यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: what to wrestle with devendra fadnavis now asked ncp ajit pawar