लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंत्रालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी लावून देण्यासाठी सात आरोपींनी मंत्रालयात मुलाखत घेऊन ९ लाख ५५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली, तर तीन अद्याप फरार असून, दोषींना त्वरित अटक करून आपणास न्याय देण्याची मागणी राहुल तायडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
लॉरेन्स हेनरी (४५, रा. अष्टविनायक लॉनजवळ, म्हाळगीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शिल्पा उदापुरे (४०, रा. अष्टविनायक लॉनजवळ, म्हाळगीनगर), वसंतकुमार ऊर्फ वसंतराव उदापुरे (६०, रा. पंचतारा हाऊसिंग सोसायटी, नरेंद्रनगर) आणि विजय पाटनकर (४०), नितीन साठे (४१), सचिन डोळस (४५) आणि बाबर नावाचा शिपाई (५५) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
राहुल तायडे (रा. सुगतनगर नारी रोड, जरीपटका) हे नोकरीच्या शोधात होते. तेवढ्यात त्यांच्या मित्रासोबत आरोपी लॉरेन्स हेनरी त्यांच्या घरी आला. त्याने मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून वेळोवेळी तायडे यांच्याकडून ९ लाख ५५ हजार रुपये घेतले. त्याने तायडे यांची मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीदेखील केली. त्यानंतर मुंबईच्या मंत्रालयात आरोपी शिल्पा उदापुरेच्या नावाची पाटी लावलेल्या कॅबिनमध्ये तायडे यांची मुलाखतदेखील आरोपींनी घेतली. परंतु, आरोपींनी २०१९ मध्ये पैसे घेऊनही जॉइनिंग लेटर न दिल्यामुळे तायडे यांनी तगादा लावला असता आरोपींनी त्यांना मंत्रालयीन आयकार्डसुद्धा दिले. हे आयकार्ड दाखविल्यानंतर मंत्रालयात सहज प्रवेश मिळत होता. परंतु, अनेक दिवस होऊनही आरोपींनी नोकरीवर रुजू करून न घेतल्यामुळे तायडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिल्यानंतर यातील आरोपी हेनरीला मागील आठवड्यात मुंबईतून अटक करण्यात आली. फसवणुकीतील सहा आरोपी अद्याप फरार असून, त्यांना अटक करून आपणास न्याय देण्याची मागणी तायडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे लागेबांधे
मंत्रालयात आरोपींनी आपल्या नावाची पाटी लावून तेथे मुलाखत घेतल्याचे चंद्रपूरमध्ये झालेल्या पोलिस तक्रारीतून सिद्ध झाले आहे. यामुळे यात मंत्रालयातील बड़े अधिकारीदेखील सामील असल्याची दाट शक्यता आहे. नागपुरातदेखील मंत्रालयातील काम करून देतो, अशी बतावणी करीत पैसे घेऊन मुंबईच्या चकरा मारणाऱ्या दलालांची संख्या वाढली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात २०० जणांच्या फसवणुकीची शक्यता
आरोपींनी महाराष्ट्रात २०० च्या वर बेरोजगारांची फसवणूक केल्याची शक्यता तायडे यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली. यातील फसवणूक झालेल्या चार जणांनी आतापर्यंत हुडकेश्वर, चंद्रपूर आणि वर्धा येथील पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.