coronavirus; कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 11:13 IST2020-03-20T11:12:00+5:302020-03-20T11:13:44+5:30
आज कोरोनाचा कहर सर्वांना घाबरवून सोडत आहे. तुकडोजी महाराजांनी संसर्गजन्य आजारांबद्दल १९५५ मध्ये लिहिलेल्या ‘ग्रामगीता’या ग्रंथातून जागृत केले आहे.

coronavirus; कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठेही थुंकू नका, कुठेही आणि काहीही खाऊ नका, संसर्ग होईल, असे वागू नका, अशा सूचना आता आरोग्य विभागाकडून आणि सरकारकडून होत आहे. असे असले तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथामध्ये दिलेला इशारा आम्ही सारे विसरलो. राष्ट्रसंत म्हणतात,
‘कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला?
कोठे जेवला, संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र’
कोरोना व्हायरसच्या दिवसात सारेच दहशतीत आले आहेत. स्वच्छतेवर आज भर दिला जात असला तरी ग्रामगीता या ग्रंथातूून सांगितलेले तत्त्वज्ञान समाजाने आचरणात आणले नाही. त्यामुळे आज कोरोनाचा कहर सर्वांना घाबरवून सोडत आहे. तुकडोजी महाराजांनी संसर्गजन्य आजारांबद्दल १९५५ मध्ये लिहिलेल्या ‘ग्रामगीता’या ग्रंथातून जागृत केले आहे.
‘त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतचि गेला,
बळी घेतले हजारो लोकांला, वाढोनि साथ.’
चीनमध्ये उगम पावलेला कोरोना जगभर पसरत आहे. जगाच्या पाठीवर हजारो माणसांचे प्राण या आजाराने गेले आहेत. भारतामध्ये आणि महाराष्ट्रतही पहिल्या टप्प्यातून हा आजार आता दुसऱ्या टप्प्यात सरकत आहे. तसेच आलेल्या आपत्तीपासून बचाव करण्याच्या धावपळीत सारे जग दिसत आहे. हे असे का घडले, याचा विचार करायलाही आज कुणाकडे वेळ नाही. कारण आलेली आपत्ती मोठी आहे. सरकार यातून जनतेला वाचविण्यासाठी परिश्रम करीत आहे. हे आज सुरू असले तरी तुकडोजी महाराजांनी याचे कारणही ग्रामगीतेमधून केव्हाचेच सांगितले आहे. माणसाच आचारविचार बिघडले, त्यामुळे रोगराईने शिरकाव केला. गाव असो किंवा शहर, माणसांचे आचरण बिघडले. वैचारिकतेत फरक पडला. यावर उपायही राष्ट्रसंतांनीच सांगितला आहे.
‘गाव व्हावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एकएक घर,
आणि त्याहूनि घरात राहणार, करावा लागेल आदर्श.
प्रकृतीच्या विरुद्ध आहार, नाही काळवेळ सुमार,
आंबट, तेलकट आदि विषम मिश्र, ऐसा आहार विषारी.’
खानपानासंदर्भात आज जनजागरण केले जात आहे. माणसांचा आहार काय असावा, त्यात सात्त्विकता कशी असावी, याचे मार्गदर्शनही
महाराजांनी ग्रामगीतेमधून केले आहे. सात्त्विक आहारातून निर्माण होणारे विचार आणि आचारही सात्त्विक असतात. त्यातून मिळाणारे निरोगी आरोग्य सर्वांच्याच हिताचे असले तरी ऐकतो कोण? म्हणूनच राष्ट्रसंत ग्रामगीतेतून सात्त्विक संतापही व्यक्त करतात.
‘पहिले खावोनि मस्त व्हावे, मग औषधी घेवोनि पचवावे,
ऐसे उपद्रव कायसासि करावे, उन्मततपणे?’
निरोगी आयुष्यासाठी त्यांनी सांगितलेला मंत्र मोठा आहे. या ग्रंथाच्या ‘ग्राम निर्माण पंचक’ या चौदाव्या अध्यायातील ‘ग्राम आरोग्य’ या विषयावरील विवेचनात त्यांनी यावर उपायही सांगितला आहे.
‘नियमित सात्त्विक अन्नचि खावे, साधे ताजे भाजीपाला बरवे,
दूध, दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधाची.
निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्पमृत्यू अथवा रोगाची साथ,
हे पाऊल न ठेवतील गावात, तुकड्या म्हणे.’