चुकीची चप्पल घातल्याने गेला जीव ! चोर म्हटल्याच्या वादातून तरुण कामगाराचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:58 IST2026-04-07T18:49:37+5:302026-04-07T18:58:36+5:30
Nagpur : चुकीने दुसऱ्याची चप्पल घातल्याने निर्माण झालेला वाद विकोपास गेला आणि चौघांनी कामगारास बेदम मारहाण केली. डोक्यावर लाकडी दांडा व काठ्यांनी वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण कामगाराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Wearing the wrong slippers cost a life! A young worker lost his life in an argument over being called a thief
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : चुकीने दुसऱ्याची चप्पल घातल्याने निर्माण झालेला वाद विकोपास गेला आणि चौघांनी कामगारास बेदम मारहाण केली. डोक्यावर लाकडी दांडा व काठ्यांनी वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण कामगाराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून चार आरोपींना अटक केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौघान शिवारातील विटांच्या भट्टीजवळ रविवारी (दि. ५) रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
समीर राजू नैताम (वय १८, रा. ढाबाडीह, जिल्हा बलोदा-बाजार, छत्तीसगड) असे मृताचे नाव असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमेश निषाद (१९), गणेश निषाद (३७), सुनील निषाद, सलिम खान चौघेही रा. ताला, जिल्हा बिलासपूर, छत्तीसगड या चौघांचा समावेश आहे. चौघान (ता. रामटेक) शिवारात वीटभट्टी आहे. या पाचजणांसह फिर्यादी समीर महेश नैताम (१८, रा. ढाबाडीह, जिल्हा बलोदा-बाजार, छत्तीसगड) या वीटभट्टीवर कामगार म्हणून काम करायचे आणि त्या भट्टीच्या परिसरात राहायचे.
समीर महेश नैताम व समीर राजू नैताम हे दोघेही २६ मार्चला रामटेक परिसरातील गडमंदिर परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी समीर राजू नैताम याने चुकीने उमेश निषादची चप्पल घातली होती. त्यामुळे उमेशने समीरला चोर म्हटले होते. मध्यंतरी प्रकरण शांत राहिले. दोन्ही समीर रविवारी रात्री उमेशकडे गेले आणि त्यांनी चोर का म्हटले, अशी उमेशला विचारणा केली. याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा भांडणाला सुरुवात झाली. या मारहाणीत समीर गंभीर जखमी झाला. त्याला दुसऱ्या समीरने रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. समीर महेश नैताम याच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ (१), १०९ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
लाकडी दांड्यांनी केले डोक्यावर वार
या भांडणात चारही आरोपींनी समीरच्या डोक्यावर लाकडी दांडा व काठ्यांनी वार केले. तो जखमी होऊन खाली कोसळताच चौघेही घटनास्थळाहून पळून गेले. मात्र, रामटेक पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे चौघांनाही मरारवाडी (ता. रामटेक) परिसरातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे, तसेच त्यांच्याकडून हत्या करण्यासाठी वापरलेले दांडे व काठ्या जप्त केल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.