'प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रवाहात आणू' ; केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम
By आनंद डेकाटे | Updated: November 17, 2025 20:30 IST2025-11-17T20:27:59+5:302025-11-17T20:30:45+5:30
Nagpur : भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने ९,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या. आदिवासी जनजातीसाठी पक्के घर उपलब्ध करुन दिली जात आहेत.

We will bring every tribal village into the flow of development; Union Tribal Development Minister Juel Oram
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारने ९,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या. आदिवासी जनजातीसाठी पक्के घर उपलब्ध करुन दिली जात आहेत. देशातील प्रत्येक गावातील आदिवासींसाठी विशेष मोहीम असून प्रत्येक आदिवासी पाड्याला आम्ही विकासाच्या प्रवाहात आणू , असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व युवक युवती संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक ऊईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, मध्य प्रदेश येथील जनजातीय कार्य मंत्री कुंवर विजय शाह, खासदार फग्गनसिंह कुलस्ते, माजी महापौर मायाताई ईवनाते, माजी खासदार समीर उराव, रंजना कोडापे, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री जुएल ओराम म्हणाले, गेल्या सहा वर्षांमध्ये एकलव्य शाळेसाठी १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी केंद्राने वितरीत केला. यात नवीन ५० एकलव्य शाळा आपण साकारत आहोत. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावात विकासाचा एक नवा अध्याय निर्माण केला जात आहे. सुमारे ६० हजार पेक्षा अधिक गावात हे अभियान सुरु आहे. यावेळी आदिवासी नृत्य स्पर्धेतील विविध विजेत्या संघांना प्रशस्तीपत्र व पुरस्काराचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. संचालन शिल्पा भेंडे यांनी केले तर आभार अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी मानले.
आदिवासी समाजात नव आत्मविश्वास - प्रा. डॉ. अशोक ऊईके
तीन दिवसीय भव्य महोत्सवातून संपूर्ण आदिवासी समाजात नवा आत्मविश्वास निर्माण करण्यात यश आले. तीन दिवस आदिवासी समाजातील अधिकारी, नवीन पिढी यांच्या विचाराला चालना देता आली. याबरोबर आदिवासी संस्कृतीतील नृत्य प्रकाराला प्रवाहित करता आल्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक ऊईके यांनी सांगितले.
आदिवासी मुलींनी अधिक धाडसी बनावे : नरहरी झिरवळ
रोजगार व स्वयंरोजगारातील नवीन संधी या शिक्षणातून निर्माण होणाऱ्या आहेत. याला धैर्य आणि कल्पकतेची, कौशल्याची जोड असणे आवश्यक आहे. या संधीला गवसणी घालण्यासाठी आदिवासी समाजातील मुलींनी आपल्यातील लाजाळूपणा बाजुला ठेऊन अधिक धाडसी व धैर्य घेऊन शिक्षणासाठी स्वत:ला सिध्द करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. खा. फग्गनसिंह कुलस्ते, मध्यप्रदेशचे जनजातीय कार्य मंत्री कुवर विजय शाह, दीपमाला रावत, रंजना कोडापे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.