आम्हीच बनणार पदवीधरचे सिकंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:39+5:302020-12-04T04:22:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा मतदानाची टक्केवारी सुमारे २९ टक्क्यांनी वाढल्यामुळे अनेकांनी ...

We will be the graduate Alexander | आम्हीच बनणार पदवीधरचे सिकंदर

आम्हीच बनणार पदवीधरचे सिकंदर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा मतदानाची टक्केवारी सुमारे २९ टक्क्यांनी वाढल्यामुळे अनेकांनी नव्याने राजकीय बेरीज-वजाबाकी सुरू केली आहे. वाढलेल्या मतदानामुळे आम्हालाच फायदा होईल व पदवीधरवर आमचाच वरचष्मा असेल, असा दावा उमेदवारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नेमका सिकंदर कोण बनणार व कुणाचे गणित बरोबर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा मतदानाची टक्केवारी व आकडा दोन्हीदेखील वाढला आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला ५५.८१ टक्के मते आली होती. तर काँग्रेसला सुमारे २३ टक्के मते मिळाली होती. यंदा कुणालाही अपेक्षा नसताना मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे ज्या पक्षाने जास्त नोंदणी केली त्यालाच फायदा होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस-भाजपासह इतर उमेदवारांकडूनदेखील आम्हीच जास्त नोंदणी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात उमेदवारांमधील धाकधूकदेखील तेवढीच वाढली आहे. वाढलेली टक्केवारी भाजपच्या पथ्यावर पडते की कॉंग्रेस व इतर उमेदवारांना याचा फायदा मिळतो हे गुरुवारीच स्पष्ट होऊ शकेल.

भाजपच्या पॉकेट्समध्ये उत्साह

, दक्षिणमध्ये निराशा

मंगळवारी नागपूर जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा असलेल्या भागांमध्ये ६५ ते ७० टक्के मतदान झाले. यात पश्चिम, दक्षिण-पश्चिम, पूर्व व मध्य नागपुरातील अनेक भागांचा समावेश होता. काँग्रेसची भिस्त दक्षिण नागपूरवर होती. मात्र अनेक बूथवर मतदानाचे प्रमाण ३५ ते ४५ टक्के इतके राहिले. महालात जास्त मतदान होईल अशी भाजपला आशा होती. प्रत्यक्षात तेथेदेखील टक्केवारी ५० ते ६० टक्क्यांच्या मध्येच राहिली.

काय म्हणतात उमेदवार...

यंदा पदवीधरमध्ये परिवर्तन

महाविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते सोबत होते. मला भरघोस मतदान झाले आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा आम्हालाच होणार आहे. यंदा पदवीधरमध्ये निश्चितपणे परिवर्तन पहायला मिळेल.

-अभिजित वंजारी, उमेदवार, कॉंग्रेस

पदवीधरचा गड आम्हीच राखणार

पदवीधरसाठी पक्षाने तळागाळात जाऊन तयारी केली होती. शिवाय कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोंदणी झालेले मतदार घराबाहेर निघाले. वाढलेल्या मतदानाचा आम्हालाच फायदा होईल व पदवीधरचा गड आम्हीच राखू.

-संदीप जोशी, उमेदवार, भाजप

आमचाच विजय निश्चित

यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. याचे खरे श्रेय कॉंग्रेस व आमचे उमेदवार अभिजित वंजारी यांना जाते. आम्ही नोंदणी केलेले मतदार मतदानासाठी समोर आले. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.

-विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

बहुजन समाजातील मतदान बदल घडवेल

निवडणुकीत आमच्याकडे धनशक्ती नव्हती, मात्र कार्यकर्त्यांची ताकद होती. वाढलेले मतदान हे बिगर भाजप व कॉंग्रेस मतदारांचे आहे. बहुजन समाजातून जास्त मतदान झाले असून निश्चित आमचा विजय होईल.

-राहुल वानखेडे, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी

प्रस्थापितांविरोधात जाणार निकाल

जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा निकाल प्रस्थापितांविरोधात जातो असे दिसून आले आहे. मी विदर्भाच्या मुद्द्यावर लढलो होतो व लोकांनी भरपूर समर्थन दिले. विशेष म्हणजे माझ्या उमेदवारीने विदर्भाचा मुद्दा परत चर्चेला आला आहे.

-नितीन रोंघे, अपक्ष उमेदवार

Web Title: We will be the graduate Alexander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.