उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावरच वीजबिलमाफीबाबत बोललो : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 22:31 IST2020-11-27T22:28:44+5:302020-11-27T22:31:49+5:30
Nitin Raut, electricity bill वीजबिलांच्या माफीवरुन राज्यातील राजकारण तापले असताना राज्यातील मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारकडूनच ही चूकच झाली असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता उपमुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावरच वीजबिलमाफीबाबत बोललो : नितीन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिलांच्या माफीवरुन राज्यातील राजकारण तापले असताना राज्यातील मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारकडूनच ही चूकच झाली असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता उपमुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे. पहिल्या बैठकीत अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमईआरसीला बिलमाफीसंदर्भात काय करावे यासंदर्भात विचारणा केली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच बिलमाफीबाबत मी बोललो. ते माझे व्यक्तिगत मत नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही भूमिका मांडली. अशोक चव्हाण आमचे नेते आहेत व ते कोणतेही वक्तव्य करतात त्याला अर्थ असतो. वीजबिलमाफीसंदर्भात पहिली बैठक अजित पवार यांनी घेतली. त्यावेळी अशोक चव्हाण कोविड उपराचाराकरता रुग्णालयात होते. त्या बैठकीत चर्चा झाली होती व बहुतेक त्याची माहिती चव्हाण यांना नव्हती. एमईआरसीला अजित पवार यांनी फोन लावून विचारणा केली. बिल माफ करण्यासाठी काय करावे याबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रस्ताव आमच्याकडे पाठवला व कॅबिनेटसमोर मांडायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, असे नितीन राऊत यांनी सांगितले.
वित्त विभागाच्या उपमुख्यमंत्र्यांनी चार बैठका घेतल्या. वेगवेगळे प्रस्ताव मागण्यात आले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा बैठका घेतल्या व आठ वेळा कॅबिनेट नोटदेखील बनविण्यात आल्या, अशी माहितीदेखील राऊत यांनी दिली.