अभय लांजेवार
उमरेड : राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी रांगेत लागत असतानाचा तो गोंगाट. वर्गात आसनस्थ होण्यापूर्वी दप्तरातून पुस्तके काढत हळुवार सुरू असलेली किलबिल. हलक्याफुलक्या गप्पा. तासिका संपल्यानंतर काही सेकंदात संपूर्ण वर्गाचा घेतलेला कानोसा. मधल्या सुटीची ‘घंटा’ वाजताच एकत्रितपणे ‘लंच बॉक्स’ काढत जेवणावर तुटून पडण्याचा तो आनंद... शाळा संपल्यानंतर घराकडे धावतपळत सुसाट सुटणारे असंख्य विद्यार्थी. असा शाळकरी विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिनक्रम कोरोनाने हिरावून घेतल्याचे चित्र सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी दृष्टिक्षेपात आले. लोकमतने ‘ऑन दि स्पॉट’ पोहोचत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या संवेदना समजून घेतल्या. आम्ही ‘ते’ दिवस मिस करतोय, अशा हळव्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त करीत मन मोकळे केले.
कोरोनाच्या एन्ट्रीनंतर १३ मार्चपासून शाळा बंद कराव्या लागल्या. तब्बल १० महिन्यानंतर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नवीन सत्रातील शाळेच्या पहिल्या दिवसाला हजेरी लावली. पहिल्या दिवशी पाल्यांसोबत पालक सोबतीला होते. पालकांकडून संमतीपत्र स्वीकारल्यानंतर शाळांमध्येच थर्मल गन, ऑक्सिमीटर, हॅन्डवॉश आणि सॅनिटायझर या बाबींकडे शाळांनी अत्यंत बारकाईने लक्ष दिले. एका डेस्क बेंचवर एकच विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था केल्या गेली. झिकझॅक पद्धतीचा अवलंबसुद्धा काटेकोरपणे करण्यात आला. विशेषत: काहीसे घाबरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसोबतच पालक व शिक्षकांकडून हिंमत, विश्वास आणि आत्मविश्वासाचीही गरज आहे, एवढे नक्की! ऑनलाईन नकोच!
काही महिन्यापासून ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत शिक्षणाचे धडे दिले जात आहे. ऑनलाईन की थेट शाळेतूनच शिक्षण हवे यावर प्रतिक्रिया विचारली असता ऑनलाईन नकोच, असे उत्तर अंजली कोकडे या विद्यार्थिनीने दिले. खूप दिवसानंतर वर्गात बसायला, भेटायला आणि लांबूनच का होईना बोलायला मिळाल्याने खूप आनंदी आहोत, असे नेहा यादव म्हणाली. परीक्षा होऊ शकली नाही. खूप महिन्याने वर्गमैत्रिणी एकत्रित आलो. उत्सुकता होती. आठवणींना उजाळा मिळाला, अशी प्रतिक्रिया मयुरी जायेभाये हिने व्यक्त केली. आम्ही शाळेत सर्व नियमावलीचे तंतोतंत पालन करणार, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला.
इच्छा असूनही गैरहजर
पहिल्या दिवशी बहुतांश शाळेत ४० ते ५० टक्केच हजेरी दिसून आली. त्यातही नववीपेक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बऱ्यापैकी होती. विशेषत: असंख्य विद्यार्थी गावखेड्यातील आहेत. दुसरीकडे बहुतांश ठिकाणच्या एसटी बसेस अद्याप पूर्ववत सुरू झाल्या नाहीत. सुमारे ३० टक्के विद्यार्थी गावागावातून शहरात शिक्षणासाठी येतात. अशावेळी शाळेत जाण्याची इच्छा असूनही एसटीअभावी असंख्य विद्यार्थी गैरहजर राहिले, अशी समस्या मुख्याध्यापिका विभा भुसारी तसेच एस. के. मांढरे व आदी शिक्षकांनी मांडली.
--
उमरेड येथील जीवन विकास वनिता विद्यालयातील विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करताना.
शाळेत आल्यानंतर थर्मल गनच्या माध्यमातून तपासणी करताना शिक्षिका.