दरवर्षी आपण खातो जवळपास २५० ग्रॅम प्लास्टिक

By सुमेध वाघमार | Updated: July 22, 2025 19:35 IST2025-07-22T19:35:26+5:302025-07-22T19:35:53+5:30

डॉ. चंद्रशेखर मेश्राम : मेंदूत वाढतेय प्लास्टिकचे प्रमाण

We eat about 250 grams of plastic every year. | दरवर्षी आपण खातो जवळपास २५० ग्रॅम प्लास्टिक

We eat about 250 grams of plastic every year.

नागपूर : प्लास्टिक प्रदूषणाचा मानवी मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. विशेषत:, मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण ठरले आहे. वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्यानुसार, डिमेंशिया असलेल्या लोकांच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सची पातळी सामान्यांपेक्षा १० पट अधिक असते. दरवर्षी आपण जवळपास २५० ग्रॅम प्लास्टिक खात असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.
   

जागतिक न्यूरोलॉजी फेडरेशन १२ वा जागतिक मेंदू दिन साजरा करीत आहे. त्या निमित्ताने डॉ. मेश्राम ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, सरकारने पॉलिथिन पिशव्यांवर बंदी घातली असली तरी, प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. स्नॅक्स, पाणी, खाद्यपदार्थ सर्वत्र प्लास्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. यामुळे जमीन, पाणी, हवा आणि अन्नात प्लास्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होत आहे.

मेंदूला मायक्रोप्लास्टिक्सचा धोका
डॉ. मेश्राम यांनी सांगितले, डॉ. निहार्ट आणि त्यांच्या सहकाºयांनी ‘नेचर मेडिसिन जर्नल'मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, १ नॅनोमीटर ते ५ मिमी आकाराच्या प्लास्टिक कणांना मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात, तर १ नॅनोमीटरपेक्षा लहान कणांना नॅनोप्लास्टिक्स म्हणतात. हे प्लास्टिकचे कण पोटातून, श्वासाद्वारे किंवा त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि रक्ताभिसरणात मिसळून यकृत, मूत्रपिंड आणि विशेषत: मेंदूत जमा होतात. मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण यकृत आणि मूत्रपिंडापेक्षा २०-३० पट जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

मेंदूमध्ये सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक्स 
ट्युनिशियातील वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे माजी विश्वस्त डॉ. रियाद गुदेर यांनी सांगितले की, २०१६ मध्ये मृत पावलेल्या सामान्य लोकांच्या मेंदूची २०२४ मध्ये मृत पावलेल्या लोकांशी तुलना केली असता, २०२४ च्या मेंदूमध्ये सुमारे ५० टक्के जास्त मायक्रोप्लास्टिक्स आढळले. मेंदूतून आढळलेल्या १२ प्रकारच्या प्लास्टिक पॉलिमरपैकी, बाटल्या आणि कपसारख्या पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे पॉलीइथिलीन सर्वाधिक प्रमाणात दिसते. धक्कादायक बाब म्हणजे, मेंदूच्या वजनाच्या सुमारे ०.५ टक्के प्लास्टिक असते, म्हणजेच आयुष्यभर आपल्या मेंदूत अंदाजे ७ ग्रॅम सूक्ष्म आणि नॅनो प्लास्टिक जमा होते.

चहाच्या प्रत्येक घोटात हजारो मायक्रोप्लास्टिक्स  
चहाचे कप असो की चहाच्या पिशव्या या प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. जेव्हा त्यात गरम चहा ओतला जातो किंवा पिशव्या गरम पाण्यात ठेवल्या जातात तेव्हा प्लास्टिक वितळते आणि चहाच्या प्रत्येक घोटात हजारो मायक्रोप्लास्टिक्स आपण ग्रहण करतो. 

मुळांद्वारे मायक्रोप्लास्टिक्सचे शोषन
आपल्या आहारात फळे आणि भाज्या असल्या तरी, त्या मायक्रोप्लास्टिक्सपासून सुरक्षित नाहीत. मुळांद्वारे मायक्रोप्लास्टिक्स शोषून घेऊन ते बिया, पाने आणि फळांमध्ये प्रवेश करतात. सफरचंद आणि गाजरात प्रति ग्रॅम एक लाखांपेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक्स आढळतात.

एक लिटर प्लास्टिक बाटलीतून २ लाखांवर प्लास्टिक कण पोटात
प्लास्टिकच्या बाटलीतून एक लिटर पाणी पितो तेव्हा २ लाख ४० हजार प्लास्टिक कण आपल्या पोटात जातात. प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम केल्याने त्या अन्नात अब्जावधी प्लास्टिकचे कण सोडले जातात हे दिसून आले आहे. टूथपेस्टमध्येही मायक्रोप्लास्टिक्स असतात.

मासे खाताना प्लास्टिकसुद्धा खातो
समुद्रात २४ ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक्सचे तुकडे आहेत, त्यामुळे समुद्री प्राणी अनेकदा प्लास्टिक खातात हे आश्चर्यकारक नाही. मासे खाताना, तुम्ही त्यांनी खाल्लेले सर्व प्लास्टिक देखील खातो. 

लिपस्टिकमध्ये असतात भरपूर मायक्रोप्लास्टिक्स
त्वचा हा प्लास्टिकच्या प्रवेशाचा आणखी एक स्रोत आहे. सौंदर्यप्रसाधने, लिपस्टिकमध्ये भरपूर मायक्रोप्लास्टिक्स असतात. आपण घालतो त्या सिंथेटिक पॉलिस्टर किंवा नायलॉन कपड्यांपासून बनवलेले मायक्रोप्लास्टिक्स त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात.

पर्यावरणाची काळजी आवश्यक
अमेरिकेतील पर्यावरणीय न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुपचे अध्यक्ष प्रो. पीटर स्पेन्सर आणि फ्रान्समधील पर्यावरणीय न्यूरोलॉजी ग्रुपचे माजी अध्यक्ष प्रो. जॅक रीड यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यानुसार, प्लास्टिकबाबतची समस्या आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठी आहे आणि आपल्या शरीराचे आणि मेंदूचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे अनिवार्य आहे.

Web Title: We eat about 250 grams of plastic every year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.