राख बंधारा फुटला, जलस्त्रोत दूषित; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाेटीस देण्याऐवजी सूचनावजा सल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 16:16 IST2022-07-18T16:08:22+5:302022-07-18T16:16:33+5:30
राख संग्रहण तलावाचा बंधारा फुटला : ४७.४० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

राख बंधारा फुटला, जलस्त्रोत दूषित; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाेटीस देण्याऐवजी सूचनावजा सल्ले
काेराडी (नागपूर) : खसाळा (ता. कामठी) शिवारातील वीज केंद्राचा राख संग्रहण बंधारा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये राखमिश्रित पाणी पसरले. या पाण्यामुळे ४७.४० हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले असून, जलस्राेत दूषित झाले आहेत. या प्रकरणात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज केंद्राला नाेटीस बजावण्याऐवजी त्यांच्या अधिकाऱ्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांसाेबत रविवारी या बंधाऱ्यासह संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत यावर कायमस्वरूपी उपाययाेजनांबाबत काही सूचना केल्या.
राख संग्रहण बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीचे महानिर्मिती आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र सर्वेक्षण केले. महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे त्यांनीही फुटलेला बंधारा व नुकसानीची पाहणी केली. बंधाऱ्यातील राखमिश्रित पाण्यामुळे कामठी तालुक्यातील खैरी, खसाळा, मसाळा, कवठा व सुरादेवी शिवारातील पिकांचे, तसेच मसाळा येथील ६० घरांचे नुकसान झाले असून, या भागातील जलस्राेत दूषित झाले आहेत. शिवाय, पांदण रस्ते खरडून गेले असून, खैरी गावाजवळी नाल्यावरील पूल, मसाळा-सुरादेवी रस्त्यावरील पुलाचे नुकसान झाले. मसाळा येथील बलदेव बरबटकर यांची म्हैश मृत्यूमुखी पडली. या सर्व बाबींचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती महानिर्मितीचे अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. बंधारा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
माती व पाणी प्रदूषणाबाबत उपाययाेजना शून्य
वीज केंद्रातील राखेत आधीच घातक घटक मिसळलेले असतात. बंधाऱ्यातील राखमिश्रित पाण्यामुळे पाच गावांच्या शिवारातील शेती (शेतातील माती), तसेच विहिरी, नाले व इतर जलस्राेत दूषित झाले आहेत. याचे मानवी व गुरांच्या आराेग्यावर, तसेच शेतीच्या सुपीकतेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानिर्मिती प्रशासन काय प्रभावी उपाययाेजना करणार आहे, हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही.
पाणीपुरवठ्याच्या विहिरीत साचली राख
या बंधाऱ्यातील राखमिश्रित पाणी नाल्याद्वारे वाहत येत खैरी, खसाळा, मसाळा व कवठा या गावांच्या पाणीपुरवठा विहिरींमध्ये शिरल्याने त्यात राख साचल्याने या विहिरी काही काळासाठी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महानिर्मितीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तात्पुरती उपाययाेजना केली आहे.