दिनार असल्याचे सांगून दिली पेपरची रद्दी; दोन लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 19:56 IST2022-05-21T19:55:54+5:302022-05-21T19:56:17+5:30
Nagpur News दुबईतील चलन असलेले १०० दिनार असल्याचे सांगून त्या मोबदल्यात दोन लाख रुपये घेऊन दिनारऐवजी पेपरची रद्दी देऊन फसवणूक केल्याची घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

दिनार असल्याचे सांगून दिली पेपरची रद्दी; दोन लाखांनी फसवणूक
नागपूर : दुबईतील चलन असलेले १०० दिनार असल्याचे सांगून त्या मोबदल्यात दोन लाख रुपये घेऊन दिनारऐवजी पेपरची रद्दी देऊन फसवणूक केल्याची घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
फिरोज नझीर खान (४२, फरिदनगर, झिंगाबाई टाकळी) असे फिर्यादीचे नाव आहे. फिरोजचा मित्र राजू उर्फ सुनील चरणदास गजभिये यास नागपूर विमानतळावर दोन व्यक्ती भेटल्या. त्यांनी दुबईतील चलन असलेल्या दिनारच्या १०० नोट विक्री करायच्या असल्याचे सांगितले. त्या मोबदल्यात दोन लाख रुपये ॲडव्हान्स मागितला. त्यानंतर फिरोज आणि राजू हे रुईगंज दरगाह जुनी कामठी येथे दोन लाख रुपये घेऊन गेले. दोन आरोपींनी त्यांच्याजवळील १०० दिनारच्या नोट असलेली पिशवी त्यांना दिली. त्यानंतर आरोपी दोन लाख घेऊन निघून गेले. आरोपी गेल्यानंतर फिरोझने पिशवी तपासली असता त्यात पेपरची रद्दी होती. फिरोझने दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
...............