पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या ‘वॉन्टेड’ला अटक
By योगेश पांडे | Updated: April 26, 2023 17:03 IST2023-04-26T17:03:23+5:302023-04-26T17:03:53+5:30
घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली

पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या ‘वॉन्टेड’ला अटक
नागपूर : पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या एका ‘वॉन्टेड’ गुन्हेगाराला अखेर पकडण्यात यश आले आहे. अफरोज शमशाद अन्सारी (२१) असे गुन्हेगाराचे नाव असून तो भांडेवाडीतील एका सलूनमधून फरार झाला होता. पोलिसांनी तुकडोजी पुतळ्याजवळून त्याला सापळा रचत अटक केली.
घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये पोलिस त्याचा शोध घेत होते. २० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तो भांडेवाडी येथील समाधान सलून येथे बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक व पोलिस शिपाई त्या पत्त्यावर रवाना झाले. तेथे अफरोज आढळला व त्यांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला शांतपणे सोबत चलण्यास सांगितले. मात्र, त्याने आरडाओरड सुरू केली. ते पाहून लोक तेथे जमले. मुलाबाबत ऐकताच बाप शमशाद अन्सारीदेखील मोटारसायकलने सलूनसमोर पोहोचला. त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली व पोलिस माझ्या मुलाला कसे घेऊन जातात ते बघतोच, अशी भाषा वापरू लागला. दोघेही बापबेटे हुज्जत घालून आरडाओरड करू लागले. यातच अफरोजने वीट उचलून स्वत:च्याच डोक्यात मारून घेतली. अफरोजच्या वडिलाने एका शिपायाला धक्का देत खाली पाडले व हीच संधी साधून अफरोज तेथून फरार झाला होता.
गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक २ कडून त्याचा शोध सुरू होता. तांत्रिक तपासातून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकडोजी पुतळ्याजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व घेराव टाकून त्याला अटक केली. अफरोजने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने त्याला पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, गजानन चांभारे, संतोष मदनकर, किशोर ठाकरे, शेषराव राऊत, सुनिल कुंवर, कमलेश गेहलोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.