आक्षेप घेणाऱ्या मतदारांना पुन्हा मिळतील मतपत्रिका; बाेगस मतदान रद्द करण्याची निर्वाचन अधिकाऱ्यांना सुचना
By निशांत वानखेडे | Updated: March 13, 2026 20:41 IST2026-03-13T20:40:22+5:302026-03-13T20:41:03+5:30
Nagpur : आरमाेरी येथील १० सदस्यांच्या मतपत्रिका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पाेस्टातून लंपास केल्याची बाब पाेस्टमास्टर यांनीच उघड केली हाेती. या मतदारांच्या नावाने दुसऱ्या व्यक्तिमार्फत परस्पर मतदानही करण्यात आल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनीच चाैकशीतून पुढे आणली.

Voters who object will get ballots again; Election officials instructed to cancel bogus votes
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांची चाेरी आणि बाेगस मतदानाच्या तक्रारींवर लवादाने शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय दिला. गडचिराेली जिल्ह्याच्या आरमाेरी येथील ज्या मतदारांनी मतपत्रिकांची चाेरी व त्यांच्या नावाने बाेगस मतदान झाल्याच्या तक्रारी नाेंदविल्या, ते मतदान रद्द करून त्यांना नव्याने मतपत्रिका देऊन मुदतीत मतदान करण्याची संधी द्यावी, असे आदेश लवादाने निर्वाचन अधिकाऱ्यांना दिले.
आरमाेरी येथील १० सदस्यांच्या मतपत्रिका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पाेस्टातून लंपास केल्याची बाब पाेस्टमास्टर यांनीच उघड केली हाेती. या मतदारांच्या नावाने दुसऱ्या व्यक्तिमार्फत परस्पर मतदानही करण्यात आल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनीच चाैकशीतून पुढे आणली. अशा गैरप्रकारांबाबत वि. सा. संघाचे आजीव सदस्य विनाेद देशमुख यांनी लवाद अॅड. मल्हार विश्वरुपे यांच्याकडे तक्रार केली हाेती. या तक्रारींवर त्यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांना उत्तर मागितले.
गुरुवारी निर्वाचन अधिकारी अॅड. माेहन पारखी यांनी लवादाकडे जावून आपली बाजू मांडली. ७,४९२ आजीव सदस्यांना पाठविलेल्या मतपत्रिकांपैकी २००० वर मतपत्रिका परत आल्या. त्यापैकी ४०० ते ४५० मतदारांना ओळख तपासून त्यांच्या मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. मतपत्रिका पाठवून २०-२२ दिवसाचा कालावधी लाेटल्यानंतर व मतमाेजणीला काही दिवस शिल्लक असताना मतपत्रिका गहाळ झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्या तक्रारीबाबत याेग्य ती कारवाई हाेत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर लावद अॅड. विश्वरुपे यांनी तक्रारकर्त्या मतदारांना नव्या मतपत्रिका देण्याचे व मुदतीत त्यांचे मतदान करून घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या नावाने झालेले अवैध मतदान रद्द करण्याची सुचनाही केली.
गिरीश गांधींची उमेदवारी अबाधित
दरम्यान अध्यक्षपदाचे उमेदवार गिरीश गांधी हे मते मिळवण्यासाठी गैरकृत्याना प्राेत्साहित करून मतांची चाेरी करीत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करून दाेषींवर फाैजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी लवादाकडे केली हाेती. मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर हाेण्यापूर्वी व मतदान सुरू असताना माध्यमांद्वारे प्रसारित मजकुराच्या आधारे उमेदवारी रद्द करण्याची तरतूद नसल्याचे उत्तरात सांगत लवादाने गिरीश गांधींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली.
१४ जणांनी केले नव्याने मतदान
लवादाने हा निर्णय देताच मतपत्रिका मिळाली नाही अथवा बाेगस मतदान झाले असे १४ आजीव सभासदांचे अर्ज शुक्रवारी निवडणूक अधिकारी पारखी यांनी आज प्राप्त झाले. शहानिशा करून या १४ जणांना नव्या मतपत्रिका दिल्या व त्यांना मतदानही केल्याची माहिती पारखी यांनी दिली. यातील मतदान झालेल्या बाेगस मतपत्रिका रद्द करण्यात आल्या.