"त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती"; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:45 IST2025-03-18T08:16:19+5:302025-03-18T09:45:02+5:30

नागपूर हिंसाचार प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar demanded action against those found guilty in the Nagpur violence case | "त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती"; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं

"त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती"; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं

Vijay Wadettiwar on Nagpur Violence: औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन सुरु झालेल्या वादाला नागपुरात सोमवारी हिंसक वळण लागलं. शिवजयंतीच्या दिवशीच नागपुरच्या महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या हिंसाचाराच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि लाठीचार्ज करुन जमावाला पांगवल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांनकडून मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यानींही ही मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेकडून नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी मोहिम सुरु करण्यात आली. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

यानंतर सायंकाळी दोन गटांमधील तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. त्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी काही समाजकंठकांनी गाड्यांची तोडफोड करत त्या पेटवून दिल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली

"नागपुरात झालेली घटना दुर्दैवी आहे. दोन समाजामध्ये तणाव आणि दगडफेक झाली. नागपूर सारख्या शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण? शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचे काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण करेल असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. कबरीचा वाद जाणूनबुजून निर्माण करण्यात आला. इतिहास तोडून मोडून पुढे आणण्याचे काम केलं गेलं. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीच्या प्रश्नातून काय साध्य होणार आहे. ती कबर ठेवली काय आणि नाही त्यामध्ये कुणाचा फायदा होणार आहे. यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

"दोन्ही समाजामध्ये शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे. जनतेने कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा.मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैवी आहे. कोणीही कितीही मोठं असलं तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे," असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Vijay Wadettiwar demanded action against those found guilty in the Nagpur violence case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.