उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 22:45 IST2025-08-29T21:05:32+5:302025-08-29T22:45:51+5:30

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी घेतला शोध

Video of car salesman kidnapped and beaten over loan dispute uploaded on Snapchat! | उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!

उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!

नागपूर : चार लाखांच्या उधारीच्या वादातून चार आरोपींनी एका वाहन विक्रेत्याचे भर दिवसा अपहरण केले. आरोपींनी एका दुकानात विक्रेत्याला नेत तेथे बेदम मारहाण केली व तो व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे काही तासांतच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अपहृत व्यक्तीची सुटका केली. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने वेळेत पावले उचलल्याने अपहृत व्यक्तीचा जीव वाचला.

शाहीद अली अमजद अली (३१, ओमसाईनगर, कळमना) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शाहीदने आरोपी अफजल अहमद जावेद इकबाल (२९, अन्सारनगर, मोमीनपुरा) व सय्यद अतिफ जोहर सय्यद नजीम जोहर (३२, हफीज बेकरीजवळ, मोमीनपुरा) यांच्याकडून चार लाख उधार घेतले होते. त्या पैशांवरून त्यांचा शाहीदसोबत वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपींनी शाहीदला बेलेनगर येथील मामाच्या दुकानातून दुचाकीवर बसवून शांतीनगर पुलाकडे नेले. पैशांबाबत बोलायचे आहे असे त्यांनी कारण सांगितले होते. आरोपींच्या मनात काळेबेरे आहे याची शंका शाहीदला आली.

रस्त्यात कामरान नकीब अशपाक अहमद (२९, मोमीनपुरा) हा दिसला. शाहीदने त्याला मदतीसाठी हाक मारली. मात्र तो आरोपींसोबतच होता. तिघांनीही मिळून शाहीदला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते त्याला सय्यदच्या
दुल्हन नावाच्या कपड्यांच्या दुकानात घेऊन गेले. तेथे कोंंडून त्याला परत मारहाण करण्यात आली. तेथे जमाल अहमद जावेद इकबाल (२६, अन्सार नगर, मोमीनपुरा) या आरोपीने शाहीदच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार केला व तो स्नॅपचॅटवर अपलोड केला. दरम्यान शाहीद यांनी ११२ वर फोन करून पोलिसांना हा प्रकार कळविला.

कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने शाहीदच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लोकेशनचा शोध घेतला व सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाहीदची सुटका केली. कळमना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन दुचाकी, चार मोबाईल, बेसबॉल स्टीक जप्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, शशिकांत मुसळे, ज्ञानेश्वर मोरे, विलास गमे, विशाल भैसारे, वसीम देसाई, ललित शेंडे, अविनाश चौहान, अजय गटलेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Video of car salesman kidnapped and beaten over loan dispute uploaded on Snapchat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.