पतीला पाठविलेल्या व्हिडीओ क्लीपिंगने नववधूच्या वैवाहिक आयुष्यात कालविले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:58 IST2019-06-12T00:55:42+5:302019-06-12T00:58:46+5:30
पतीच्या मोबाईलवर आलेल्या अश्लील क्लिपिंगने आठवडाभरातच नववधूच्या वैवाहिक आयुष्यात विष कालविले आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी बाबुळखेडा येथील रहिवासी आरोपी अक्षय अरूण शेंडे याच्याविरोधात विनयभंग आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पतीला पाठविलेल्या व्हिडीओ क्लीपिंगने नववधूच्या वैवाहिक आयुष्यात कालविले विष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीच्या मोबाईलवर आलेल्या अश्लील क्लिपिंगने आठवडाभरातच नववधूच्या वैवाहिक आयुष्यात विष कालविले आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी बाबुळखेडा येथील रहिवासी आरोपी अक्षय अरूण शेंडे याच्याविरोधात विनयभंग आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय युवतीचे २ जून रोजी लग्न झाले होते. तरुणीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून कुटुंबात मोठी बहीण व भाऊ आहे. आरोपी अक्षय हा तरुणीच्या वस्तीमधीलच राहणारा असल्याने त्याच्या परिचयाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी दुपारी अक्षयने तरुणीच्या पतीच्या मोबाईलवर तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ क्लीपिंग पाठविले. ही क्लीप पाहताच पतीला धक्का बसला. त्याने पत्नीची विचारपूस केल्यानंतर क्लीप बघून तिलाही धक्का बसला. अधिक चौकशी केली असता आरोपी अक्षयद्वारे हे कृत्य केल्याचे उघड झाले. तरुणीने नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंग तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेमुळे तरुणीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाले असून तिच्याप्रति पतीचे वागणेही बदलले आहे. त्याने तरुणीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे अक्षयच्या कृत्याने तरुणीच्या कुटुंबामध्ये रोष वाढला आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.