विदर्भाने पाहिले बेरोजगार रंगकर्मींसाठी झोळी धरून हात पसरलेले श्रीराम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:28 AM2019-12-18T00:28:45+5:302019-12-18T00:34:29+5:30

रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे.

Vidarbha saw Shriram Lagoo to beg for the unemployed artiest | विदर्भाने पाहिले बेरोजगार रंगकर्मींसाठी झोळी धरून हात पसरलेले श्रीराम लागू

विदर्भाने पाहिले बेरोजगार रंगकर्मींसाठी झोळी धरून हात पसरलेले श्रीराम लागू

Next
ठळक मुद्देरंगभूमीवरचा अन् रसिकांच्या हृदयातला ‘नटसम्राट’महेश एलकुंचवार यांच्याशी होते स्नेहाचे नाते

प्रवीण खापरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे.
नागपूर-विदर्भात नाट्य प्रयोगांसाठी ते अनेकदा आले. त्यांना रंगमंचावर बघण्यासाठी रसिकांची झुंबड उडत असे. अतुल पेठे यांच्या दिग्दर्शनातील ‘सूर्य पाहिलेला माणूस’, निळू फुले यांच्यासोबत ‘प्रेमाची गोष्ट’, ‘अग्निपंख’सारखी त्यांची बरेच नाटके नागपूरकरांनी पाहिली आहेत. मात्र, त्यांचे विदर्भाशी असलेले खास कनेक्शन म्हणजे प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार आणि दुसरे राजदत्त हे होते. महेश एलकुंचवार यांनी खास श्रीराम लागू यांच्यासाठी ‘आत्मकथा’ हे नाटक लिहिले होते. प्रतिमा कुळकर्णी यांच्या दिग्दर्शनात लागू यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारली होती आणि या नाटकाचे नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात प्रयोगही झाले होते. तर, एलकुंचवार यांनीच लिहिलेले व दिग्दर्शित केलेले ‘क्षितिजापर्यंत समुद्र’ या नाटकातही त्यांनी प्रमूख भूमिका साकारली होती. या नाटकात ज्योती सुभाष त्यांच्या सहअभिनेत्री होत्या. तर, प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘देवकीनंदन गोपाळा’ या सिनेमात संत गाडगेबाबांची भूमिका लागू यांनी अजरामर केली आहे. या दोन प्रमुख गोष्टी वगळता ते नागपूरकरांना कायम लक्षात राहिले ते बेरोजगार रंगकर्मींच्या भरणपोषणासाठी त्यांचे झोळी पसरलेले हात बघून. बेरोजगार रंगकर्मींना वेतन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘सामाजिक कृतज्ञता निधी’साठी त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. हा प्रयोग घेऊन ते नागपूर व विदर्भातही फिरले. तनुजा, सदाशिव अमरापूरकर आदी मोठे रंगकर्मीही या नाटकात होते. लागू अक्षरश: नाटक संपल्यानंतर झोळी घेऊन त्यात योगदान देण्याचे आवाहन ते रसिकांना करीत होते. नागपूरकरांनी त्यांच्या आवाहनाला साद देत भरघोस सहकार्य केले होते. त्या काळात त्यांनी या नाट्य प्रयोगाच्या भरवशावर महाराष्ट्रभरातून २५ लाख रुपयाचा निधी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ म्हणून उभारला होता.
आम्ही पालखीचे भोई असे म्हणत त्यांनी ‘लमाण’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यात रंगभूमीवरचे किस्से, त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण पाट सादर झाला आहे. त्यांचे ‘वाचिक अभिनय’ हे पुस्तक तर नवोदित रंगकर्मींसाठी अत्यंत मोलाचे ठरत आहे.

२०११ मध्ये घेतली होती मुलाखत - अजेय गंपावार
डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत २०११ मध्ये घेतली होती. श्रीराम लागू यांच्यामुळेच पटेल रंगभूमीवर आले आणि दिग्दर्शक बनले. म्हणून त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी त्यांची पाऊण तासाची संपूर्ण मुलाखतच मी रेकॉर्ड केल्याची माहिती प्रसिद्ध मुलाखतकार अजेय गंपावार यांनी दिली. त्या मुलाखतीत ते प्रचंड नास्तिक असल्याचे स्पष्ट झाले. ‘देवाला रिटायर करा’ असे आवाहनही त्यांनी केले होते. नसिरुद्दीन शहा यांची मुलाखत नागपुरात घेतली तेव्हा त्यांनी श्रीराम लागू यांची आवर्जून आठवण केली. ‘अ‍ॅक्टर हा अ‍ॅथ्लिट असला पाहिजे’ असे श्रीराम लागू नेहमी म्हणत असत, अशी माहितीही अजेय गंपावार यांनी दिली.

माझा फे्रण्ड, फिलॉसॉफर आणि गाईड होते. त्यांचे वय झाले होते ही गोष्ट खरी असली तरी त्यांचे अस्तित्व मार्गदर्शक होते. या दु:खातून मला बाहेर पडायला बराच वेळ लागणार आहे.
महेश एलकुंचवार, प्रख्यात नाटककार

लागूंना अनेकदा नागपुरात बघितले. धनवटे रंगमंदिरात त्यांची अनेक नाटके झाली. रंगमंदिराच्या आवारात प्रसिद्ध असलेली ‘ती दोन बाकडे’ त्यांच्या विशेष स्नेहाची होती आणि त्यावर बसून ते गप्पाही मारत. प्रचंड चिकाटीचा माणूस होता आणि अखेरपर्यंत रंगभूमीची सेवा केली. त्यांना चष्म्याशिवाय दिसत नव्हते आणि पात्र चष्म्याविना होते. तरीदेखील फूटपट्टीने मोजून त्यावर सराव करून ते नाटक करीत असताना मी त्यांना बघितले आहे.
महेश रायपूरकर, ज्येष्ठ रंगकर्मी

राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अनसूयाबाई काळे सभागृहात झालेल्या श्रीराम लागू यांच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाट्य प्रयोगाची प्रकाशयोजना व नेपथ्य करण्याचे भाग्य मला लाभले. माझ्याकडून प्रयोगासाठी तयार करवून घेतलेले प्रसिद्धीचे पोस्टर्स त्यांना प्रचंड आवडले होते. ते पोस्टर सोबत नेऊ का, अशा नम्रतेने मला त्यांनी विचारले होते.
गणेश नायडू, ज्येष्ठ रंगकर्मी

लागू यांची वैचारिक पातळी अतिशय उच्च दर्जाची होती. नागपूरच्या रंगभूमीशी त्यांचे जवळचे संबंध होते. नागपुरात झालेल्या ‘काचेचा चंद्र’ या नाटकाचे बरेच प्रयोग मी पाहिले. ते रंगकर्मींसाठी एक आदर्श होते.
मदन गडकरी, ज्येष्ठ रंगकर्मी

‘ग्रॅज्वेट’ या नाटकात मी कुत्रा साकारला होता. नागपुरात आले असता या नाटकाच्या तालमीला त्यांनी भेट दिली. तालीम बघून ‘प्रभाकर, कुत्र्याला काही बांधले का? इजा व्हायला नको’ असा सल्ला त्यांनी दिला होता. त्याचे स्मरण आजही होते.
प्रभाकर अंबोणे, ज्येष्ठ रंगकर्मी

त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील एका युगाचा अस्त झाला. ते मुळात डॉक्टर मात्र त्यांना अभिनयाची आवड. वैद्यकीय क्षेत्र सोडून ते अभिनय क्षेत्रात आले. ‘पिंजरा’मधील त्यांनी रंगवलेला मास्तर कायम स्मरणात राहणारा आहे.
प्रकाश एदलाबादकर, प्रसिद्ध निवेदक

Web Title: Vidarbha saw Shriram Lagoo to beg for the unemployed artiest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.